मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढू लागले आहेत. अशातच गुरुवार, (५ सप्टेंबर) रोजी जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनचे कमाल दर ४ हजार ६८० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वाढली आहे.
दरात वाढ होत असल्याने बाजार समित्यांत सोयाबीनची आवकही काहीशी वाढत असल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्य तेलाच्या किमतींत वाढ झाली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम सोयाबीनच्या दरावर होत असल्याने बाजार समित्यांत सोयाबीनच्या दरात तेजी येत आहे.
शासनाने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या हमीभावात १०२ रुपयांची वाढ करून, सोयाबीनला प्रति क्विंटल ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केले आहेत. अशातच वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनचे दर कमाल दर ४ हजार ६८० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले. जुन्या सोयाबीनला हे दर मिळत आहेत.
बाजारात आवक कमी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनला मागणी वाढली. त्यामुळेच सोयाबीनच्या दरात तेजी येऊ लागली असून, येत्या काही दिवसांत सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वाढली आहे. प्रत्यक्ष आठवडाभरातच हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पावसामुळे हंगाम लांबणीवर पडल्याचा परिणाम
बाजारात आवक कमी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनला मागणी वाढली. त्यामुळेच सोयाबीनच्या दरात तेजी येऊ लागली असून, येत्या काही दिवसांत सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वाढली आहे. प्रत्यक्ष आठवडाभरातच हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून देशात पावसाने धडाका लावला आहे. त्यामुळे यंदाचा सोयाबीन हंगाम लांबणीवर पडला आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाची मागणी वाढली आहे. त्यामुळेच सध्या सोयाबीनच्या दरात तेजी आल्याची माहिती व्यापाऱ्याऱ्यांनी दिली.
उत्पादन घटण्याची शक्यता कमीच
सोयाबीनच्या दरात तेजी येत असतानाच राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला. या पावसाचा मोठा फटका शेंगा, फुलावर असलेल्या सोयाबीनला बसला. तथापि, यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता खूप कमी असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
पावसामुळे हंगाम लांबणीवर पडला आहे, तर श्रावण संपल्यानंतर डीओसीच्या मागणीत वाढ झाल्याने सोयाबीनच्या दरात तेजी आहे. तथापि, तेलाच्या आयातीवर कर लावल्यास सोयाबीनच्या दरातील तेजी कायम राहू शकते.- आनंद चरखा, व्यापारी, वाशिम
कोठे किती कमाल दर?
जिल्हा | दर |
कारंजा | ४६८० |
मंगरुळपीर | ४६४० |
मानोरा | ४६२५ |
वाशिम | ४६२० |
रिसोड | ४५०५ |