Soybean Market Update:नैसर्गिक संकटाच्या माऱ्यामुळे उत्पादनात घट होऊनही शेतकऱ्यांना पडत्या भावात सोयाबीन विक्री करावे लागले. आज-उद्या भाववाढ होईल, या आशेवर एक ते दोन महिने प्रतीक्षा केली. मात्र, भाववाढ झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री केले.(Soybean Market Update)
आता मात्र तब्बल पाच महिन्यांनंतर सोयाबीनच्या भावात क्विंटलमागे तीनशे ते चारशे रुपयांची वाढ झाली आहे; परंतु सोयाबीन विक्री केल्यानंतर झालेल्या भाववाढीवरून शेतकऱ्यांत नाराजीचा सूर उमटत आहे.(Soybean Market Update)
हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहतात. खरिपात एकूण क्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होतो.
मागील दोन वर्षांपासून मात्र सोयाबीन शेतकऱ्यांना साथ देत नसल्याचे चित्र आहे. पावसाचा लहरीपणा, पीक ऐन भरात असताना यलो मोझॅकचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात घट होत आहे. यंदा तर काही भागात निम्म्याहून अधिक घट झाली.
अशा परिस्थितीत सोयाबीनला किमान सहा हजार रुपयांचा भाव मिळेल, अशी आशा होती. मात्र, मार्चअखेरपर्यंत सोयाबीनने सरासरी चार हजारांचा पल्लाही गाठला नाही.
जवळपास चार महिने भाववाढीची प्रतीक्षा करूनही भाववाढ होत नसल्याचे पाहून बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली. या शेतकऱ्यांना किमान ३ हजार ४०० ते कमाल ४ हजार रुपयांचा भाव मिळाला. तर सरासरी ३ हजार ८०० रुपयांचा भाव राहिला.
आता शेतकऱ्यांनी सोयाबीन विकल्यानंतर भावात किंचित वाढ झाल्याचे मागील आठवडाभरापासून पाहायला मिळत आहे. सध्या सरासरी ४ हजार १०० रुपयांपर्यंत सरासरी भाव जात आहे. तर जास्तीत जास्त ४ हजार ४०० रुपयांपर्यंत सोयाबीनची विक्री होत आहे. सोयाबीन विक्री केल्यानंतर झालेल्या भाववाढीचे गणित शेतकऱ्यांना लागत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
सोयाबीन विक्रीतून चार पैसे हाती येतील, असे वाटले होते; परंतु उत्पादनात घट झाली असताना पडत्या भावात सोयाबीन विक्री करावे लागले. त्यामुळे लागवड खर्चही वसूल झाला नाही. आता किंचित भाव वधारले असले तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. - रामेश्वर कव्हळे, शेतकरी
सोयाबीनच्या पेंडीला वाढती मागणी
* शासनाने मका आणि तांदळापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे. इथेनॉल निर्मितीनंतर शिल्लक राहणारी पेंड पोल्ट्री उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरली जात होती.
* सोयाबीनच्या तुलनेत मक्याची आणि तांदळाची पेंड स्वस्त मिळत होती. त्यामुळे सोयाबीन पेंडीची मागणी कमी होती; परंतु मका आणि तांदळाच्या पेंडीमुळे बर्ड फ्लूचे प्रमाण वाढल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांच्या निदर्शनास आले आहे.
* परिणामी, ते पुन्हा सोयाबीन पेंडीचा वापर करू लागले आहेत. यामुळे सोयाबीन पेंडीची मागणी वाढली असून, याचा अप्रत्यक्ष परिणाम सोयाबीनच्या दरावर होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सोयाबीन भावातील चढ-उतार
दिनांक | सरासरी भाव |
१९ मार्च | ३,७७० |
२१ मार्च | ३,८०० |
२२ मार्च | ४,०५० |
२४ मार्च | ३,९१२ |
४ एप्रिल | ४,०५० |
७ एप्रिल | ४,११० |
९ एप्रिल | ४,१७५ |
११ एप्रिल | ४,१५० |
हे ही वाचा सविस्तर : Hapus Mango: आवक वाढल्याने देवगडचा हापूस आंबा तोऱ्यात! वाचा सविस्तर