वाशिम : मागील महिन्याच्या मध्यंतरापर्यंत ४ हजारांवर घसरलेल्या सोयाबीनच्या (Soybean) दरात मागील काही दिवसांत सुधारणा (Improving) दिसली आहे. गुरुवारी वाशिमच्या बाजारातसोयाबीनला ४,६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर मिळाला.
मागील सहा महिन्यांत प्रथमच सोयाबीनने (Soybean) साडेचार हजारांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांनी दर वाढीच्या आशेने माल साठवून ठेवला होता.
तथापि, अपेक्षित दर न मिळाल्याने त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. काही शेतकऱ्यांनी दोन वर्षापासून साठवलेले सोयाबीन कवडीमोल दराने विकले; पण आता सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी येत आहे. ४ दिवसात झाली क्विंटलमागे रुपयांची ३०० वाढ झाली आहे.
सोयाबीनच्या पेंडीला वाढती मागणी
* शासनाने मका आणि तांदळापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे. इथेनॉल निर्मितीनंतर शिल्लक राहणारी पेंड पोल्ट्री उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरली जात होती.
* सोयाबीनच्या तुलनेत मक्याची आणि तांदळाची पेंड स्वस्त मिळत होती, त्यामुळे सोयाबीन पेंडीची मागणी कमी होती. तथापि, मका आणि तांदळाच्या पेंडीमुळे बर्ड फ्लूचे प्रमाण वाढल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांच्या निदर्शनास आले आहे.
* परिणामी, ते पुन्हा सोयाबीन पेंडीचा वापर करू लागले आहेत. यामुळे सोयाबीन पेंडीची मागणी वाढली असून, याचा अप्रत्यक्ष परिणाम सोयाबीनच्या दरावर होत आहे.
हरभऱ्याच्या दरातही वाढ
रब्बी हंगामातील हरभऱ्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होईल, अशी व्यापारी आणि सरकारी यंत्रणांची अपेक्षा होती. सरकारने ५,६५० रुपये प्रति क्विंटल या दराने हमीभावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु सध्या बाजारात हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी सरकारी खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवली आहे. परिणामी, बाजारातील मागणी वाढली असून, हरभऱ्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
खरिपापूर्वीची तेजी तर नाही ना?
खरीप हंगाम आता दोन महिन्यांवर आला आहे. शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे आणि बियाणे उत्पादक कंपन्याही सज्ज झाल्या आहेत. अशा परिस्थितीत, यंदा सोयाबीनचे बियाणे महागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, सोयाबीनच्या दरातील सध्याची तेजी खरिपापूर्वी बियाणे दरवाढीचे संकेत देणारी असू शकते, अशी शंका उपस्थित होत आहे.