बालाजी आडसूळ
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मागील वर्षीचा अख्खा हंगाम चिंतादायी ठरला. काढणीनंतर ४ हजारांच्या आतच महिनोंमहिने भाव अडकून राहिला. एकूणच 'हमीभाव' पावलेले शेतकरी वगळता ज्यांनी खुल्या बाजारात विकले ते 'बेभाव' ठरले, तर ज्यांनी दराच्या अपेक्षेने घरात ठेवले त्यांचे 'बेहाल' झाले आहे.(Soybean Market Update)
कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन हे मुख्य पीक. खरिपाच्या एकूण क्षेत्रात सोयाबीनचा वाटा तब्बल ८५ टक्क्यांवर. जवळपास ६५ हजार हेक्टरवर सोयाबीन. मागील खरिपात मृगाची दमदार बरसात झाली, यामुळे पेरण्या वेळेवर झाल्या. उगवणही चांगली झाली.(Soybean Market Update)
पुढे एक ओढ मिळाली तर वाढीच्या अवस्थेत असताना अतिवृष्टीचा कोप झाला. या तडाख्यातून थोडाबहुत शेतमाल हाती पडला, तर पुढे बाजारात भावाचा पत्ता नव्हता. यामुळे विकावं की ठेवावं?, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता.(Soybean Market Update)
अख्खा हंगाम गेला, तरी कोणी 'भाव' देईना
संकटाच्या गर्तेतून हाती लागलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात आले, तर बाजारात भावाचा पत्ता नाही. दर चार हजारांच्या आत. पुढेही स्थिती दोन-तीन अशीच राहिली. पुढे तर काही दिवस चारच्या आत भाव कोलमडले. एकूणच खरिपाची काढणी ते रब्बीची पेरणी या काळात भाव मंदीतच राहिले.
४१ हजार क्विंटलची बाजार समितीत आवक
डिसेंबर २०२४ अन् जानेवारी २०२५ मध्ये कळंब मार्केट यार्डात ४१ हजार क्विंटलची आवक झाली. याला किमान ३५, कमाल ४३, तर सर्वसाधारण ४१ असा प्रति किलो दर राहिला.
मुख्य आवक : दीड लाख क्विंटल
कळंब येथील मार्केट यार्डात ऑक्टोबर २०२४ मध्ये तब्बल ४४ हजार तर नोव्हेंबर महिन्यात ४४ हजार असे ८८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यास कमाल ४६, किमान ३५ तर सर्वसाधारण ४१ अन् ४२ रुपये प्रतिकिलो दर मिळाला.
हमीभाव पावला, ना बाजार मदतीला धावला...
तालुक्यात कळंब, शिराढोण, चोराखळी, घारगाव, आंदोरा आदी ठिकाणी शासकीय हमीभाव केंद्राचा काटा हलला. याठिकाणी लाखांवर क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली. यात हमीभावाचा आधार मिळालेले शेतकरी नशिबवान ठरले. याशिवाय काही 'चलाख' रावांचे यातही फावले. मात्र, हमीभावाचा कवच न लाभलेल्यांना बाजारानेही तारले नाही.
'फ्रायडे'चा चकवा, शेतकरी द्विधावस्थेत..
* खुल्या बाजारात ऑक्टोबरमध्ये ४१, नोव्हेंबरमध्ये ४२, डिसेंबरमध्ये ४२, जानेवारीत ४१, तर फेब्रुवारीत ४० रुपये प्रति किलो सर्वसाधारण दर राहिला.
* मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात या दरात थोडीशी वृद्धी मिळाली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातील शुक्रवारी, तर तो ४४ च्या पुढे गेला. मात्र, ही चकाकी दोन-तीन दिवसांची ठरली.
* पुन्हा वृद्धी याच टप्प्यावर स्थिरावली. एकार्थाने ही वाढ दीड लाख सोयाबीन विकणाऱ्यासाठी दुः खावर मीठ चोळणारी ठरली आहे. यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
सप्टेंबरच्या शेवटच्या महिन्यात माझ्या पिकाची काढणी झाली. त्यावेळी दर पडलेले, पुढे तीन-चार महिने तसेच राहिले. हमीभावाचा पण मेळ नाही लागला. आज आठ महिने झाले, माल घरी आहे. मागच्या दोन-चार दिवसांत शेदीडशेने भाव हलला, पण वाढ पुन्हा थांबली.- राजाभाऊ माणिक गंभिरे, इटकूर, ता. कळंब.
भाव वाढेल, या आशेने मी सोयाबीन घरातच ठेवले. पण, भाव काही वाढेना, शेवटी आर्थिक अडचण असल्याने विक्रीस काढले. त्याला ४३ रुपये किलोचा दर मिळाला, एकूणच ना हमीभाव मिळाला, ना वाढीव भाव मिळाला. उत्पादन खर्चही पदरी पडला नाही. - अनिकेत श्रीराम आडसूळ, इटकूर, ता. कळंब.
हे ही वाचा सविस्तर : Halad Market Update: हळदीच्या दरात 'या' कारणाने झाली घसरण वाचा सविस्तर