Join us

Soybean Market Update : सोयाबीनचे दर पोहोचले प्रतिक्विंटल 'या' दरात; शेतकऱ्यांना प्रतीक्षा हमीभावाची

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 1:12 PM

खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात येण्याअगोदर सोयाबीनच्या दरात प्रतिक्विंटल वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, अशी आशा आहे. (Soybean Market Update)

Soybean Market Update :

अकोला : 

खरीप हंगामातील सोयाबीनबाजारात येण्याअगोदर सोयाबीनच्या दरात प्रतिक्विंटल जास्तीत जास्त ४ हजार ७३० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे येत्या खरीप हंगामात सोयाबीनचे दर वाढतील, असा अंदाज असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

यंदा सरकारने सोयाबीनसाठी ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल हमीभाव निश्चित केला आहे. जिल्ह्यात सोयाबीन प्रमुख पीक आहे. या वर्षी २ लाख, ३६ हजार ३३२ हेक्टर म्हणजे ११८ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एकूण पेरणीलायक शेतीच्या ५० टक्क्यांवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. परंतु, सततच्या पावसामुळे या पिकावर प्रतिकूल परिणाम झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यात एक वर्षापासून सोयाबीनच्या दरात कमालीची घट आली होती.

यामुळे शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. मागील चार आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात सुधारणा होऊन प्रतिक्विंटल जास्तीत जास्त दर हे ४ हजार ७३० रुपयांवर पोहोचले आहेत. लवकरच सरकारने निर्धारित केलेल्या हमीभावापर्यंत हे दर पोहोचतील, अशी अपेक्षा आहे.

तुरीचे दर सरासरी दहा हजार रुपयांवर

तुरीच्या दरात अलीकडे घट झाली असून, शुक्रवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार रुपये दर मिळाला. जास्तीत जास्त १० हजार ५२५ तर कमीत कमी दर हा ८ हजार ७०० रुपये एवढा होता.

अकोल्यात शुक्रवारी १,८४० क्विंटलची आवक

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार (२६ सप्टेंबर) रोजी १ हजार ८४० क्विंटल आवक झाली. दोन आठवड्यांपासून एवढी सरासरी आवक बाजारात सुरू आहे.

■ दरम्यान, शुक्रवारी याच बाजारात प्रतिक्विंटल जास्तीत ४ हजार ७३० रुपये दर मिळाले. सरासरी दर हे ४ हजार ४०० रुपये होते, तर कमीत कमी दर ३ हजार ७०० रुपये एवढे होते.

■  या वर्षी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. परिणामी उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर हवे आहेत.

मूग, उडदाला दरवाढीची अपेक्षा

मुगाचे दर शुक्रवारी प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ८५० रुपये होते. जास्तीत जास्त दर हे ७ हजार ३०५ तर कमीत कमी ६ हजार ९५ रुपये एवढे होते. उडीद दराची स्थिती हीच होती. उडदाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ८००, जास्तीत जास्त ७ हजार २०५, कमीत कमी ६ हजार २२० रुपये दर मिळाला. या दोन्ही पिकांची या वर्षी अल्प पेरणी झाली आहे. तरीही अपेक्षित दरवाढ होत नसल्याने शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती