धुळे : सध्या हातउसनवारी फेडण्यासाठी पावसात भिजलेले सोयाबीन वाळवून शेतकरीबाजारात आणत आहेत. मात्र, आर्द्रतेच्या नावाखाली शेतकऱ्यांची काही ठिकाणी लूट केली जात आहे.
सोयाबीनची आर्द्रता मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मॉईश्चर मीटरवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने मनमानीपणे आर्द्रता नोंदविली जाते. त्यामुळे ४ हजार ८९२ प्रतिक्विंटल हमीभाव असताना शेतकऱ्यांना केवळ ४ हजार क्विंटलचा दर दिला जात असल्याची तक्रार ऐरणीवर आली आहे. सोयाबीनला कमी दर दिला जात असल्याने क्विंटलमागे शेतकऱ्यांना सुमारे ९०० रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.
काढणीला आलेले सोयाबीन साठविण्यासाठी व्यवस्था नसल्याने शेतकरी भिजलेले सोयाबीन वाळवून व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी नेतात.
खरेदी केंद्र सुरू व्हावे, बळीराजाची अपेक्षा
• सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शासनाकडून सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार होते. नंतर १० ऑक्टोबरची मुदत देण्यात आली. त्यामुळे काही व्यापारी शेतकऱ्यांना लुबाडत असल्याच्या तक्रारी सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणे गरजेचे आहे. खरेदी केंद्र कधी सुरू होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
• धुळे बाजार समितीत हायब्रीड सोयाबीनची अल्पआवक असूनही किमान, कमाल व सर्वसाधारण ४ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. पिवळ्ळ्या सोयाबीनचे दर किमान दोन हजार ७००, कमाल चार हजार ३७५ आणि सर्वसाधारण ३ हजार ७०० रुपये आहेत.
नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल
आधीच नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला उत्पन्नाचा घास पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे किमान हमीभावात खरेदी सुरु व्हावी, अशी अपेक्षा आहे. हमीभावाअभावी सोयाबीनचे दुहेरी नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. एकाच पोत्यातील सोयाबीनची आर्द्रता तीन व्यापाऱ्यांकडे वेगवेगळी येते. त्यामुळे खरी मोजणी कोणाची यासंबंधी संभ्रम निर्माण होत आहे. काही व्यापारी मनमानीपणे दर सांगून लूट करीत आहेत. यावर प्रशासनाने नियंत्रण आणावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.