Join us

soybean market update : शेतकऱ्यांना बाजारात सोयाबीनला हमीभाव मिळणार तरी कधी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 3:17 PM

वाशिमच्या बाजार समितीमध्ये नवीन सोयाबीनला चांगला दर मिळाला. परंतू आता सध्या बाजारात काय दर मिळतोय ते वाचा सविस्तर (soybean market update)

 soybean market update :

वाशिम :

येथील बाजार समितीत मुहूर्तावर नवीन सोयाबीनला प्रतिक्विंटल ५ हजार ५५५ रुपये भाव मिळाला होता. २४ सप्टेंबरला ३ हजार ८३० ते ४ हजार २७० रुपयांदरम्यान सोयाबीनला भाव मिळाल्याने दहा दिवसांतच प्रतिक्विंटल १ हजार ३०० रुपयाने घसरण झाली.

शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल आला की, भाव कोसळतात, याचा अनुभव दरवर्षी शेतकऱ्यांना येतो. यंदाही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा अनुभव सुरुवातीलाच येत आहे. मागील आठवड्यात बाजार समितीत नवीन सोयाबीन दाखल झाले. सुरुवातीला सोयाबीनला प्रतिक्विंटल ५ हजार ५०० रुपयांच्या आसपास भाव मिळाला. 

त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा किंचितशा पल्लवित झाल्या होत्या. त्यानंतर मात्र बाजारभावात हळूहळू घसरण होत २४ सप्टेंबरला ३ हजार ८३० ते ४ हजार २७० रुपयापर्यंत भाव खाली घसरले. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

असे होते सोयाबीनचे भाव ! 

दिनांकभाव (क्विंटल)
१२ सप्टेंबर५५०० - ५५५५
१५ सप्टेंबर४६००-५२५०
१८ सप्टेंबर  ४७००-५१५०
२४ सप्टेंबर३८३०-४२७०

हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी!

• सोयाबीनला प्रति क्विंटल ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर झालेला आहे. असे असतानाही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ४ हजार ८९२ रुपयांपेक्षाही कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात आहे.

• हमीभावाचा नियम डावलला जात असतानाही, या विरोधात आवाज उठवायला कोणी तयार नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

सध्या चांगली प्रतवारी असलेल्या नवीन सोयाबीनला प्रती क्विंटल सरासरी ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रुपये भाव आहे. सोयाबीनच्या भावात फारशी वाढ किंवा फारशी घसरण होणार नाही, भाव स्थिर राहतील, असे एकंदरीत चित्र आहे. - आनंद चरखा, अध्यक्ष, युवा व्यापारी मंडळ, वाशिम

नैसर्गिक संकटामुळे अगोदरच शेतकरी गारद झालेला आहे. त्यातच सोयाबीनचे भाव कोसळल्याने लागवड खर्चही वसूल होते की नाही याची शाश्वती नाही. सोयाबीनला किमान ६ हजार रुपये भाव असवा. - गौतम भगत, शेतकरी, चिखली

सोयाबीनच्या लागवड खर्चात प्रचंड वाढ झाली. त्या तुलनेत सोयाबीनला समाधानकारक हमीभाव नाही. त्यातही हमीभावाने खरेदी नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची शेती करावी की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. - सुरेश खोरणे, शेतकरी, चिखली

नव्यापेक्षा जुने सोयाबीन खातेय भाव 

नवीन सोयाबीनपेक्षा जुन्या सोयाबीनला प्रती क्विंटल २०० ते २५० रुपये जास्त भाव मिळत आहे. जुन्या सोयाबीनमध्ये ओलसरपणा नसल्याने हा भाव मिळत असल्याचे सांगण्यात येते. चांगल्या प्रकारातील जुन्या सोयाबीनला कमाल ४ हजार ५७७ रुपये भाव आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारबाजार समिती वाशिम