यंदाच्या खरीप हंगामात परिसरामध्ये सोयाबीनचा पेरा वाढला आहे. अवघ्या दीड महिन्यात सोयाबीनबाजारात येणार आहे. यंदा महागाईमुळे शेतकरी भावाची अपेक्षा ठेवून आहे. ऐन हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन बाजारात दबाव निर्माण झाल्याने सोयाबीनचे भाव आणखी पडणार की सावरणार, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
गेल्या काही वर्षांपासून कपाशी उत्पादकांना मोठा फटाका बसला आहे. याचाच परिणाम यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढला. अशातच सरकारने सोयाबीन हमीभाव ४ हजार ८९२ जाहीर केला. हमीभाव जाहीर करताना शेती भाडेपट्टा विचारात न घेतल्याने सुमारे एक हजाराने हमीभाव आधीच कमी जाहीर केले. गेल्या वर्षीपेक्षा किंचित २९० ची वाढ झाली. थोडी खुशी थोडी नाराजी व कुरबूर करत शेतकरी या हमी भावावर समाधानी झाले.
अशातच ऐन हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन बाजारात दबाव निर्माण झाल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. सध्या बाजारात ३८००-४००० रुपये भाव मिळत आहे. सरकारने तेलाची मोठ्या प्रमाणावर आयात केल्याने सोयाबीनला हमीभाव तरी मिळणार का, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
गेल्यावर्षी सुरुवातीला ५२०० रुपयांचे भाव मिळाले. पण, महिनाभरात बाजार पडल्याने वर्षभर जेमतेम हमी भाव मिळाले. सध्या ३८००-४००० आसपास भाव आहेत. मोठ्या प्रमाणावर पेरा असून पिके उत्तम आहेत. प्रचंड आवक पाहता हमी भाव तरी मिळणार का, याची शंका आहे. - दिगंबर खोंड, व्यापारी, कोद्री.
शासनाने हंगामाच्या सुरुवातीलाच शासकीय खरेदी बद्दल धोरण स्पष्ट करावे. कृषी संस्था त्या दिशेने प्रयत्न करतील, गेल्यावर्षी हरभरा खरेदी केली. शासनाचे अधिकृत धोरण लवकर ठरल्यास सोयाबीन खरेदी करता येईल. - विरेंद्र झाडोकार, अध्यक्ष, शेतकरी सहकारी संस्था, पातुर्डा.