Join us

Soybean Market : यंदा उत्पादन खर्च निघेल का नाही? शेतकऱ्यांसमोर चिंता; सोयाबीन बाजारात पुन्हा नरमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 10:15 AM

एकापाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनात प्रचंड घट होत असताना बाजारात (Market) कवडीमोल भाव मिळत आहे. परिणामी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना (Soybean Producer Farmer) लागवडही वसूल होत नसल्याने तोंडचे पाणी पळाले आहे. २१ ऑक्टोबर रोजी हिंगोलीच्या मोंढ्यात (Hingoli Market) क्विंटलमागे जवळपास दोनशे ते अडीचशे रुपयांनी भाव घसरले.

एकापाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनात प्रचंड घट होत असताना बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. परिणामी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लागवडही वसूल होत नसल्याने तोंडचे पाणी पळाले आहे. २१ ऑक्टोबर रोजी हिंगोलीच्या मोंढ्यात क्विंटलमागे जवळपास दोनशे ते अडीचशे रुपयांनी भाव घसरले.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहतात. यंदा मात्र पावसाचा लहरीपणा, किडींचा प्रादुर्भाव आणि ऐन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाचा मारा होत आहे. त्यामुळे उताऱ्यात घट झाली आहे. किमान बाजारात भाव तरी समाधानकारक मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. सोयाबीन ४ हजार ५०० रुपयांवर जात नसल्याने लागवडही वसूल होत नसल्याचे चित्र आहे.

दिवाळीचा सण जवळ आल्याने मोंढ्यात सोयाबीनची आवक वाढत आहे. भाव मात्र समाधानकारक मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. त्यामुळे सोयाबीनला सहा हजाराचा भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

हळदही काळवंडली...

■ एप्रिल, मे मध्ये सरासरी १६ हजार रुपयांचा दर मिळालेल्या हळदीचे दर जवळपास अडीच ते तीन हजार रुपयांनी घसरले आहेत.

■ येथील मार्केट यार्डात सध्या सरासरी १ हजार ८०० क्विंटल आवक होत आहे. ११ हजार २०० ते १३ हजार ३०० रुपयांदरम्यान भाव मिळत आहे.

■ अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढतील, या आशेवर हळद विक्री केलेली नाही. परंतु, भाव वधारण्याऐवजी घसरत असल्याने चिंतेत भर पडत आहे.

२१५० क्विंटल सोयाबीन विक्रीला

■ हिंगोली बाजार समितीच्या मोंढ्यात सोमवारी २ हजार १५० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर आणखी आवक वाढण्याची शक्यता आहे.

■ परंतु, कवडीमोल भावात सोयाबीन विक्री करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

■ किमान ३ हजार ९१० ते ४ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. हा भाव परवडणारा नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सोयाबीनला किमान सहा हजारांचा भाव मिळावा

यंदा पावसाचा लहरीपणा, किडींचा प्रादुर्भाव आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी, उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे सोयाबीनला किमान सहा हजारांचा भाव मिळणे गरजेचे आहे. सध्या बाजारात मिळत असलेल्या दरातून शेतकऱ्यांना लागवडही वसूल होत नाही. - पिराजी घुगे, सेलसुरा.

सोयाबीन पेरणीपासून काढणीपर्यंत भरमसाट खर्च येतो. त्यामुळे पिकास उत्पादन खर्चावर आधारित योग्य बाजारभाव मिळणे आवश्यक आहे. सध्या बाजारात मिळणारा भाव कवडीमोल असून, सोयाबीनला किमान सहा हजार रुपये प्रतिक्चिटलचा भाव मिळणे गरजेचे आहे. - डॉ. अंबादास बोराळकर, बोराळा.

हेही वाचा :  Ginger Farming Success Story : किशोररावांच्या आले शेतीची चर्चा भारी; जैविक निविष्ठांची कमाल सारी

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीशेती क्षेत्रहिंगोलीमराठवाडाविदर्भ