तळेगाव दाभाडे : आज ना उद्या सोयाबीनचे भाव वाढतील, या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन घरातच ठेवले; मात्र गेले दोन वर्षांपासून सोयाबीनला भाव मिळत नाही.
खरीप हंगामात पेरणीसाठी पैशांची अडचण निर्माण झाल्यामुळे भाव पाच हजारांच्या आसपास असला, तरी नाइलाज म्हणून शेतकऱ्यांनी ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी काढले आहेत. यामुळे पुणे बाजार समितीत आवक वाढली आहे. एकीकडे पेरणी, तर दुसरीकडे पिकांची आंतरमशागत अशी स्थिती सध्या दिसत आहे.
शेतकरी फवारणी, खते शेतामध्ये टाकण्यात व्यस्त आहेत. गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीन पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. कडधान्याचे दर मात्र वाढल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार होत आहे.
प्रमुख तृणधान्य कडधान्य व गळीतधान्यांचे बाजारभाव (प्रतिक्विंटल)
गहू ३५०० ते ४०००
ज्वारी ४१०० ते ४८००
मका २२०० ते २२५०
तूर ९७५० ते १०५००
हरभरा ६६०० ते ७०००
मूग ९२०० ते ९८००
उडीद ९००० ते ९५००
हुलगा ७००० ते ७५००
सोयाबीन ४८०० ते ५०००
गव्हाची दरवाढ
रोजच्या जेवणात पोळी वापर वाढला आहे. यामुळे ग्रामीण भागातही गहू खरेदी करण्याचे प्रमाण वाढले. मात्र मागील वर्षी पावसामुळे गहू पिकाचे नुकसान झाल्याने उत्तर भारतातील पंजाब, हरयाणा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशात उत्पादन घटले आहे. यामुळे गव्हाचे दर ५- १० रुपयांनी वाढले आहेत.
सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करता घरातच ठेवले आहे. दोन वर्षानंतरही भाव वाढले नाहीत. शेतकऱ्यांच्या अडीअडचणींसाठी थोड्याफार प्रमाणात बाजारात मालाची आवक होत आहे. सध्या प्रतिक्विंटल ४ हजार ८०० ते पाच हजार रुपये दर आहे. तर गहू पिकांचे उत्पादन घटले असल्याने सध्या गव्हाच्या दरात ५ ते १० रुपये प्रतिकिलो भाववाढ झाली आहे. - अभय संचेती, ज्येष्ठ व्यापारी