Soybean nafed center : सोयाबीन हमी केंद्र खरेदी प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. केंद्राने आता शेतकऱ्यांची परवड थांबवण्यासाठी एक उपाय शोधून काढला आहे. आता नाफेडमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएस आल्यावरच बाजारातसोयाबीन घेऊन जाता येणार आहे.
सोयाबीनच्या हमी केंद्राला यवतमाळ जिल्ह्यात मंजुरी मिळाली आहे. १४ केंद्रांवर सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. गुरुवारी(७ नोव्हेंबर) रोजी जिल्ह्यातील काही केंद्रांवर सोयाबीनची खरेदी करण्यात आली. तर अनेक केंद्रांवर सोयाबीनच्या नोंदणीला प्रारंभ झाला आहे.
आतापर्यंत १२ हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी हमी केंद्रांवर नोंद केली आहे. खुल्या बाजारात सोयाबीनला तीन हजार ते ३ हजार ८०० रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. तर हमी केंद्रामध्ये सोयाबीनला चार हजार ८९२ रुपये क्विंटलचा दर निर्धारित केलेला आहे. खुल्या बाजाराच्या तुलनेत हमी केंद्रामध्ये सोयाबीनला क्विंटल मागे ११०० रुपये अधिक मिळत आहेत.
मिळणारा दर शेतकऱ्यांना किंचित उत्पादन वाढीसाठी हातभार लावणारा आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा हमी केंद्राकडे वळविला आहे; मात्र या ठिकाणी सोयाबीनची खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांनी आपला माल खासगी बाजारात विक्रीसाठी काढला होता.
आता हमी केंद्रांवर खरेदीला प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील १४ केंद्रांवर सोयाबीनची खरेदी होणार आहे. त्यामध्ये व्हीसीएमएसचे सात केंद्र आणि मार्केटिंग फेडरेशनचे सात केंद्र निर्धारित करण्यात आलेले आहेत.
या दोन्ही केंद्रांवर आतापर्यंत १२ हजार १३२ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंद केली आहे. त्या ठिकाणी आतापर्यंत पाच हजार ६०४ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आलेली आहे.
यानंतर एकाच वेळी विक्रीसाठी गर्दी होऊ नये म्हणून दररोज सोयाबीन खरेदीसाठी मेसेज पाठविले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना मेसेज आला, अशाच शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी आणता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची होणारी परवड थांबणार आहे.
१२ टक्के ओलावा असेल तरच खरेदी
■ सोयाबीनची खरेदी करताना चांगल्या प्रकारचे सोयाबीन असणे गरजेचे आहे. यासोबतच सोयाबीनमध्ये कुठलाही काडी कचरा नसावा अशी अट आहे. यासाठी हमी केंद्रावर सोयाबीनला चाळणी केली जाते. यासोबतच ओलावा तपासणाऱ्या मशीनच्या माध्यमातून त्याची तपासणी करण्यात येते.
■ यामध्ये १२ टक्के ओलावा असेल तरच अशा सोयाबीनची खरेदी केली जाते. सद्यस्थितीत १८ ते २० टक्के ओलावा असलेले सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येत आहे.
असे सोयाबीन येऊ नये म्हणून प्रथम त्याची सॅम्पल म्हणून तपासणी करण्यात येणार आहे. यानंतरच सोयाबीन खरेदी केले जाणार आहे.
आधी येणार मोबाईलवर मेसेज
■ सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सात- बाऱ्यावर सोयाबीनचा पेरा असा उल्लेख असणे आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे आधारकार्ड आणि बँक पासबुक याचे नंबरही नोंदणी केंद्रावर द्यावे लागणार आहे.
अखेर राळेगावात नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू
राळेगाव खरेदी-विक्री संघाने हमीभावात सोयाबीन खरेदीकरिता नोंदणी सुरू केल्याने आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने जागा उपलब्ध करून दिल्याने अखेर राळेगाव येथे नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही समस्या 'लोकमत ऍग्रो' ने वृत्तातून मांडली होती.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुजित चल्लावार, संचालक गोवर्धन वाघमारे, व्यवस्थापक संजय जुमडे आदींच्या उपस्थितीत खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. खरेदी-विक्री संघात जागा उपलब्ध नसल्याने खरेदी सुरू झालेली नव्हती. प्रशासनाने अखेर राळेगाव येथे विदर्भ को-ऑपरेटिव्ह फेडरेशन शाखा यवतमाळच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी सुरू केली आहे.
या ठिकाणी ४ हजार ८९२ या दराने सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील तीन मोठे गोदाम विधानसभा निवडणुकीकरिता निवडणूक विभागाने ताब्यात घेतले.
त्यामुळे सोयाबीन खरेदीचा प्रश्न बिकट झाला होता. उपविभागीय अधिकारी विशाल खत्री, तहसीलदार अमित भोईटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुजित चल्लावार, खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक संजय जुमडे आदींनी शेतकऱ्यांचा प्रश्न समजून घेत जागेचा प्रश्न मार्गी लावला. अखेर हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे.
५४४ शेतकऱ्यांनी केली ऑनलाइन नोंदणी
हमीभावात सोयाबीन खरेदीकरिता राळेगाव तालुक्यातील ५४४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी या केंद्रावर सुरू झाली आहे. त्याकरिता नाफेडने सोयाबीनच्या दर्जाबाबत सूचना फलक लावलेला आहे.
माती, काडीकचरा, इतर दोन टक्के चिमलेले, अपरिपक्व, रंगहीन, क्षतिग्रस्त, कीड व भुंगा लागलेले, तुटलेले, भेगा पडलेले दाणे आदी निकष सोयाबीन खरेदीसाठी ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मोबाइलवर संपर्क करून माल विक्रीसाठी केव्हा आणावा याची सूचना दिली जाणार आहे, अशी माहिती खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक संजय जुमडे यांनी दिली.
घरात आलेला शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. मात्र, योग्य भाव मिळत नसल्याने जोखीम स्विकारून मालाची साठवण करावी लागत आहे. आता नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झाल्याने थोडा दिलासा या शेतकऱ्यांना सुरू झाली आहे.