गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांच्या आसपास स्थिरावले असून, सध्या बाजार समित्यांमध्ये किरकोळ आवक सुरू आहे. पाच-सहा महिन्यांपासून बाजारभाव 'जैसे थे' आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून इतक्या दिवस थांबूनही भावात सुधारणा होताना दिसत नाही.
येवला तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीन पेरणी क्षेत्रात वाढ झाली असून मागील वर्षी ४७१२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती, यावर्षी मात्र त्यात वाढ होऊन ६५९५ हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे उद्दिष्ट असून ८५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी पूर्ण झालेली आहे.
कोणत्या बाजार समितीत सोयाबीनला काय भाव?लासलगाव : ४८५१येवला : ४७५१विंचूर : ४८५१निफाड : ४८२५
सोयाबीनच्या आधारभूत किमतीत वाढसरकारने विपणन हंगाम २०२२-२३ खरीप हंगामासाठी सोयाबीनला हमीभाव चार हजार तीनशे रुपये देण्यात आला होता; पण सरकारने विपणन हंगाम २०२३-२४ साठी खरीप पिकांच्या आधारभूत किमतीमध्ये वाढ केली असून २०२३-२४ साठी खरीप हंगाम आधारभूत किमतीत वाढ होऊन ४६०० रुपये करण्यात आली आहे.
भाव वाढण्याची शक्यता कमीसध्या सोयाबीनचे दर स्थिरावले असून चालू हंगामातील वातावरण, पावसावर पुढील बाजारभाव अवलंबून असल्याने सध्या तरी बाजारभाव वाढण्याची शक्यता कमी आहे.
पुढील दोन-तीन महिने तरी हेच बाजारभाव राहतील असे व्यापाऱ्यांचे व शेती जाणकारांचे म्हणणे असून नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीन भावामध्ये साधारणपणे शंभर रुपयाची तफावत असून लासलगाव बाजार समितीमध्ये जास्त आवक आहे.
चालू हंगामातील वातावरण व पावसावर पुढील उत्पादन अवलंबून असल्याने सध्या तरी हेच बाजारभाव असतील, असा अंदाज असून नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन कमी निघाल्यास बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे.- प्रमोद शिरसाठ, व्यापारी, विंचूर
भारतातील प्रमुख तेलबिया असलेले सोयाबीन पीक शेतकऱ्यांसाठी ही प्रमुख नगदी पीक म्हणून गेल्या काही वर्षांत समोर आले आहे; परंतु इतर पिकांप्रमाणे सरकारच्या गळ्यातील हड्डी ठरल्याने मागील ऐन काढणीच्या हंगामात ५७०० रुपयापर्यंत वाढलेले भाव सरकारच्या नुसत्या सोयापेंड व तेल आयातीच्या घोषणेने गेली आठ महिने ४९०० रुपयांवर स्थिरावलेत. - हरिभाऊ महाजन, तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना, येवला
मागील वर्षी तेरा एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली, त्यातून दीडशे क्विटल सोयाबीनचे उत्पादन निघाले. १०० क्विंटल सोयाबीन ताबडतोब पाच हजार ५०० रुपये भावाने विक्री केली. उरलेली सोयाबीन भाववाढीच्या आशेने ठेवली; पण बाजारभाव वाढण्याऐवजी उलट कमी झाले, त्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागला. - मल्हारी दराडे, सोयाबीन उत्पादक, जऊळके