गेल्या अनेक वर्षापासून निसर्ग शेतकऱ्याची पाठ सोडत नाही. त्यात कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील सर्वच पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यातच मागील वर्षीपासून सोयाबीनच्या भावात ७० टक्के घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले असून, आर्थिक संकटात सापडले आहेत.
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्याचे ८० टक्के भौगोलिक क्षेत्र हे डोंगराळ भागात आहे. त्यामुळे तालुक्यात सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी जिरायती शेती करतात. तालुक्यात बरबडा, खोराड, सावंगी, तळतोंडी, लिंबे वडगाव या ठिकाणी मध्यम प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यात तळतोंडी येथील प्रकल्पाचे ९० टक्के काम झाले असून, त्याचे दहा टक्केच काम बाकी आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक कापूस व सोयाबीन आहे. यंदा अत्यल्प पावसामुळे दोन्ही पिकांचे उत्पादन घटले. त्यातच सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सोयाबीनला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ४,३०० रुपयांचा दर मिळत आहे. तर शेतात सोयाबीन सोबत कपाशीची लागवड केलेल्या अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केल्यानंतर भाववाढ झाली. सध्या आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत कापसाची विक्री होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला ११ हजारांपर्यंत भाव मिळाला होता. परंतु, सध्या ४,३०० रुपयांप्रमाणे भाव मिळत आहे. गेल्या वर्षीपासून सोयाबीनच्या दरात जवळपास ७० टक्के घट झाली आहे. त्यामुळे अद्यापही काही शेतकरी भाववाढीची प्रतीक्षा करीत आहेत.
कापसाला बारा हजारांचा भाव द्यावा
• मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन हे महत्त्वाचे पीक आहे. अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढेल, या आशेपोटी सोयाबीनची विक्री केली नाही.
• त्यामुळे आता येणाऱ्या हंगामात पेरणी कशी करावी, उसनवारी, कर्ज कसे फेडायचे, बी-बियाणे, स्वते, घरखर्च, मुलीचे लग्न, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
• त्यामुळे शासनाने कापसाला बारा आणि सोयाबीनला किमान आठ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
सध्याचे बाजार भाव क्विंटलमध्ये
कापूस | ७०००-८००० |
सोयाबीन | ४३००-४४०० |
ज्वारी | २०००-२५०० |
गहू | २५००-३००० |
तूर | ९०००-१०००० |
हरबरा | ५३००-५४०० |
तुरीला मिळते भाववाढ
● मंठा तालुक्यात मागील तीन वर्षांपासून रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे तूर पिकाचे उत्पादन घटत आहे.
● त्यामुळे सध्या तुरीचे भाव वाढत असल्याचे दिसत आहे, असे आडत व्यापारी लक्ष्मण बोराडे यांनी सांगितले