Join us

सोयाबीनचे दर काही वाढेनात; सोयाबीन उत्पादक शेतकरीवर्ग चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 12:33 PM

खासगी बाजारात शंभर रुपयांचा फरक

नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे दर वाढण्याऐवजी काही दिवसांपासून कमीच होऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडू लागली आहे. वर्षभरापूर्वी ५ हजारांवर दर सोयाबीनला मिळाला होता. परंतु यंदा सोयाबीनचा भाव ४ हजार ६०० रुपयांवर येऊन ठेपला आहे.

यावर्षी तुरीचे उत्पादन कमी झाल्याने तुरीचे भाव वधारले असून हरभऱ्याची चमक वाढली आहे. त्याचवेळी सोयाबीनचेही उत्पादन कमी झाले. परंतु दर काही वाढत नाहीत.

त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढू लागली आहे. खरीप हंगामात पाऊस तालुक्यात सरासरीपेक्षा कमी झाला. त्यामुळे तर मूग व उडीद बाद झाले. तसेच तूर, सोयाबीन व कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात कमी झाले.

तुरीचा हमीभाव ७ हजार असताना तूर क्विंटलमागे १० हजार रुपयांच्यावर विक्री होत आहे. कापसाचा हमीभाव ७ हजार असताना कापूस ६ हजार ८०० रुपये क्विंटलपर्यंत विक्री होऊ लागला आहे. परंतु सोयाबीनच्या भावामध्ये काही वाढ होत नाही. वर्षभरापूर्वी नगदी पीक सोयाबीन ५ हजारांवर पोहोचले होते.

परंतु सध्या सोयाबीन ४ हजार ४४० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान राहिले आहे. येत्या काही दिवसांत तरी सोयाबीनला योग्य भाव द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांतून होत आहे.

हेही वाचा - टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?

खासगी बाजारात शंभर रुपयांचा फरक

वर्षभर हरभऱ्याचे दर क्विंटलमागे ५५०० रुपयांच्या दरम्यान राहिले. हमीभाव ५४४० रुपये असताना आता ६३५० रुपयांवर पोहोचले. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला. यंदा नाफेडचे दर, खासगी बाजाराचे दर यामध्ये १०० रुपयांचा फरक होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी बाजारात हरभरा विकला. आता पुन्हा थोडीफार तेजी येण्याची शक्यता आहे.

हरभऱ्याचे असे राहिले आहेत दर (क्विंटलमध्ये)

२ एप्रिल ५३०० ते ५६००
४ एप्रिल ५५०० ते ५८००
६ एप्रिल ५७०० ते ५८००
८ एप्रिल ५८०० ते ५९००
१२ एप्रिल ५८०० ते ६०००
टॅग्स :सोयाबीनशेतीशेतकरीबाजार