बुलढाणा : केंद्र शासनाच्या आधारभूत खरेदी किंमत योजनेंतर्गत नाफेड (NFED) व विदर्भ मार्केटिंग फेडरेशन यांच्याकडून जिल्ह्यात १० लाख ५३ हजार क्विंटलवर सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची (Maharashtra State Wakhar Corporation) गोदामे ५० टक्केच सोयाबीन साठवल्यानंतर फुल्ल झाली आहेत. त्यामुळे ४ लाख ५८ हजार क्विंटलवर सोयाबीन खरेदी केंद्रांतच पडून आहे.
जिल्ह्यात ४६ हजारांवर शेतकऱ्यांनी हमीभावाने नाफेड केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी ३१ जानेवारी या मुदतीत सोयाबीन खरेदी करण्यात आली.
६ फेब्रुवारीपर्यंत खरेदीला मुदतवाढ मिळाली. १४ हजारांवर शेतकरी हमीभावाने सोयाबीन विक्रीपासून वंचित राहिले. नाफेडतर्फे ७ लाख ८८ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी केली. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने २.६५ लाख क्विंटल सोयाबीन खरेदी केले.
नाफेडचे सर्वाधिक सोयाबीन केंद्रांतच!
१४ हजार शेतकरी हमीभावापासून राहिले आहेत वंचित नाफेडतर्फे खरेदी केलेल्या सोयाबीनपैकी ३ लाख ७६ हजार क्विंटल सोयाबीन वखार महामंडळाच्या गोदामात साठवण्यात आले.
३ लाख ७१ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी केंद्रांतच पडून आहे. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे ८७ हजार क्विंटल सोयाबीन वखार महामंडळाच्या गोदामात साठवण्यासाठी जागा नसल्याने खरेदी केंद्रांतच पडून आहे. सोयाबीन साठवणूक व्यवस्थापन कोलमडले आहे.
हमीभावाने तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झालेली आहे. आगामी काळात तूर खरेदी करण्यात येणार आहे.
वखार महामंडळाची जिल्ह्यात चार गोदामे!
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची जिल्ह्यात चिखली, मलकापूर, मेहकर या ठिकाणी चार गोदामे आहेत. ही गोदामे सोयाबीन साठवणुकीमुळे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे हमीभावाने खरेदी केलेले ५० टक्के सोयाबीन खरेदी केंद्रावरच पडून आहे.
गोदामांमध्ये साठवण्यासाठी जागा शिल्लक नाही. वखार महामंडळातर्फे भाडेतत्त्वावर गोदाम घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. - एम. जी. काकडे, जिल्हा विपणन अधिकारी