Join us

सोयाबीन उत्पादक अडचणीत; सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी किंमतीत होतेय खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 1:43 PM

बाजारपेठेत ४,६०० रुपये हमी भाव, खरेदी दर मात्र ....

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सोयाबीनला सध्या ४५०० क्विंटलचा भाव मिळत आहे. हा भाव हमीभावापेक्षा १०० रुपये कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शासनाचा हमीभाव ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल आहे.

अगोदरच दुष्काळाने उत्पन्नात मोठा फटका बसला आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनला चांगला भाव मिळेल म्हणून गेल्या दोन वर्षापासून सोयाबीन साठवणूक करून ठेवलेले आहे. मात्र, अपेक्षित भाव मिळत नसल्याने नाईलाजाने शेतकरी आपली गरज भागविण्यापुरती सोयाबीनची विक्री करीत आहेत.

भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात यंदा आतापर्यंत १३७१० क्विंटल सोयाबीनची खरेदी विक्री केली आहे. विशेषतः सोयाबीन निघाल्यानंतर सुरुवातीला सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात ४७०० ते ५००० रुपयांपर्यंत भाव मिळाले. मात्र, डिसेंबरपासून कमी कमी होत गेलेले भाव ४२०० ते ४३०० रुपयांपर्यंत खाली आले. भोकरदन तालुक्यात गेल्या तीन ते चार वर्षांत सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.

खरीप हंगामात इतर पिकांपेक्षा सोयाबीनला उत्पादन खर्च कमी लागतो व उत्पन्नही बऱ्यापैकी मिळते म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड चालू केलेली आहे. मात्र, एका वर्षी दहा हजार रुपयांपेक्षा जास्त भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी दुसऱ्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात पेरा वाढवला.

चांगले भाव मिळतील म्हणून शेतकऱ्यांनी साठवणूक सुरू केली. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या मिळणाऱ्या भावाबद्दलच्या अपेक्षा पूर्णतः फोल ठरत चालल्या आहेत.

६ फेब्रुवारीपासून हमीभाव केंद्र बंद

> शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीनची विक्री बंद करून साठवणूक करून ठेवले. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात हमीभावापेक्षा २०० ते रुपयांपर्यंत भाव कमी होते. ३००

> शासनाचे हमीभाव ४६०० रुपये असताना खासगी बाजारात आता ४५०० 3 रुपये भाव आला आहे. म्हणजे शंभर रुपये कमी आहे. शासनाची हमीभाव खरेदी केंद्रे सहा फेब्रुवारीपासूनच बंद झाली आहेत.

३० टक्क्यांपेक्षा जास्त सोयाबीन पडून

> सध्याच्या स्थितीतही सोयाबीन उत्पादक अनेक शेतकऱ्यांच्या घरात ३० टक्क्यांपेक्षा जास्त सोयाबीन पडून आहे.

> यावर्षी तर उत्पादन खर्चही निघालेला नाही. त्यामुळे साठवणूक करून ठेवलेल्या सोयाबीनला काही दिवसांनंतर म्हणजे निवडणूक संपल्यानंतर चांगला भाव मिळेल, या अपेक्षेवर शेतकऱ्यांनी अजूनही सोयाबीन तसेच ठेवले आहे.

हेही वाचा - निंबोळी अर्काच्या वापरामुळे वाचतो २५ टक्क्याहून अधिक कीटकनाशकांचा खर्च

टॅग्स :सोयाबीनशेतकरीबाजारशेतीपीक