राज्यात सोयाबीनचे आवक घटत असून आज दुपारी चार वाजेच्या सुमारास एकूण 6 हजार 474 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली होती.आज केवळ एकाच बाजारपेठेत सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक बाजार भाव मिळाला असून उर्वरित सर्व बाजार समित्यांमध्ये दरात बदल नाही.
आज सांगली बाजार समितीत 14 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली असून सर्वसाधारण 4800 रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला. आज सर्वाधिक आवक अमरावतीत झाली असून त्या खालोखाल अकोला, बुलढाणा, नागपूर , यवतमाळ येथेही पिवळ्या व लोकल सोयाबीनची आवक झाली. आवक अधिक असली तरी हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याचे पणन विभागाच्या माहितीवरून समोर आले. मागील एक महिन्यापासून सोयाबीनच्या दरात वाढ होत नसल्याची तक्रार कायम असून अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणुकीला पसंती दिली आहे. त्यामुळे सोयाबीनची आवक कमी होत असून सर्वसाधारण 4000 ते 4500 रुपयांपर्यंत क्विंटल मागे भाव मिळत असल्याचे चित्र आहे.
काल सोयाबीनचे भाव कसे होते?
राज्यात सोयाबीनची आवक मंदावली असून मागील चार दिवसांपासून बाजारपेठेत विक्रीत चढउतार दिसून येत आहे. होळी, धुळवडीनंतर ही आवक काही प्रमाणात वाढली होती. शनिवार, रविवारी पुन्हा सोयाबीनची आवक घटल्याचे दिसून आले.यंदा सोयाबीनच्या दरानेही शेतकऱ्यांची निराशा केली असून आता कडक उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे.
सोमवारी राज्यात २४४ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. यावेळी धाराशिवमध्ये ७५ क्विंटल सोयाबीनला ४५०० रुपयांचा भाव मिळत असून हिंगोलीच्या पिवळ्या सोयाबीनला ४२७५ रुपयांचा भाव मिळत आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. तर आलेल्या उत्पादनालाही चांगला दर न मिळाल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. तर सध्या बाजारातील सोयाबीनची आवक कमी झाली असून दरही कमीच मिळत असल्याचे चिन्ह आहे.