भाववाढीच्या प्रतीक्षेत जवळपास सहा ते सात महिने विक्रीविना ठेवलेल्या सोयाबीनची दरकोंडी कायम आहे. आता पावसाळ्याला सुरुवात झाली असून, खरीप पेरणीच्या तोंडावर बी- बियाणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
त्या अनुषंगाने शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीसाठी काढले जात आहे. परंतु, पडत्या भावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कन्हाळे परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा सर्वाधिक करतात. गतवर्षी पीक कोवळे असतानाच पावसाच्या लहरीपणाचा फटका बसला. त्यानंतर येलोमोड़ोंकचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली.
अशा परिस्थितीत सोयाबीनला किमान सहा हजाराचा भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, पाच हजाराचा पल्लाही गाठला नाही.
आज उद्या भाव वाढतील, या आशेवर शेतकऱ्यांनी सहा ते सात महिने सोयाबीन विक्रीविना ठेवले. परंतु, खरीप जवळ आला तरी भाव वाढले नाहीत. यापुढेही भाववाढीची शाश्वती कमीच असल्याने शेतकरी आता सोयाबीन विक्रीसाठी काढत आहेत.
शेतकऱ्यांना आता बी - बियाणे खरेदीसाठीही पैशांची आवश्यकता भासते. त्यामुळेही सोयाबीनची विक्री केली जात आहे. परंतु, घटलेले उत्पादन, लागवड खर्चाचा विचार केल्यास सोयाबीन परवडले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
येणाऱ्या हंगामात तरी भाव समाधानकारक मिळावा
■ गतवर्षी खरिपाची पिके कोवळी असताना पावसाच्या लहरीपणाचा फटका बसला.
■ या संकटात तग धरलेले सोयाबीन जोमात असताना येलोमोझेंकचा प्रादुर्भाव झाला.
■ त्यामुळे उत्पादन निम्म्याखाली आले होते.
■ अशा परिस्थितीत सोयाबीनला किमान सहा हजाराचा भाव मिळेल, अशी आशा होती.
■ मात्र, पाच हजाराचा भावही मिळाला नाही. सध्या तर साडेचार हजाराखाली सोयाबीन विक्री करावे लागत आहे.
■ त्यामुळे लागवडही वसूल झाला नाही.
■ आता येणाऱ्या हंगामात तरी भाव समाधानकारक मिळावा, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांनो, सोयाबीनचे एकरी उत्पादन वाढवायचे ना? मग करा या अष्टसूत्रीचा वापर!