हिंगोली येथील मोंढ्यात १४ मे रोजी सोयाबीनची आवक ८०० तर ५०० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. यंदा सोयाबीनची दरकोंडी कायम असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. तर हरभऱ्याचेही उत्पादन घटले त्यामुळे मिळणारा भाव कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनकडे पाहतात. त्यामुळे खरिपात एकूण क्षेत्राच्या तुलनेत निम्मेहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होते. तर इतर क्षेत्रावर तूर, कापूस, हळद, मूग, उडीद आदी पिके पेरली जातात. गतवर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली.
मात्र, पावसाचा लहरीपणा नडला तसेच सोयाबीन ऐन भरात असताना येलोमोझॅकचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे बाजारात भाव सहा हजारांवर मिळेल अशी आशा होती. मात्र, सोयाबीनने यंदा पाच हजाराची पल्ला गाठला नाही. परिणामी, अनेक भागातील शेतकऱ्यांना लागवडही वसूल झाला नाही.
आज उद्या भाव वाढतील, या आशेवर शेतकऱ्यांनी जवळपास पाच महिने सोयाबीन विक्रीविना घरातच ठेवले. परंतु, भाव वाढता नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली असून, आता खरीप हंगाम एक ते दीड महिन्यांवर आला आहे.
अशा परिस्थितीत सोयाबीन घरी ठेऊन तरी काय करणार म्हणून शेतकरी आता मिळेल त्या भावात सोयाबीन विक्रीसाठी मोंढ्यात आणत आहेत. या सोयाबीनला ४ हजार ५०० ते ४ हजार ३०० रुपयांदरम्यान भाव मिळत आहे.
तर सध्या सरासरी ८०० क्विंटलची आवक होत आहे. तसेच सध्या मोंढ्यात हरभऱ्याची आवक ५०० क्विंटल होत असून, ५ हजार ६०० ते ५ हजार ८६५ रुपयांदरम्यान भाव मिळत आहे. येणाऱ्या दिवसात हरभऱ्याचे भाव वधारण्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु, सोयाबीनच्या दरवाढीची शाश्वती व्यापारी मंडळीही देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
हेही वाचा - स्पर्धा परीक्षा सोडून माळरानात फुलविली फळबाग; मराठवाड्यात परदेशी फळांचा थाट