गेल्या अनेक वर्षांपासून निसर्ग शेतकऱ्याची पाठ सोडत नाही. त्यात कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ. यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील सर्वच पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यातच मागील वर्षीपासून सोयाबीनच्या भावात ७० टक्के घट झाली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आले असून, आर्थिक संकटात सापडले आहेत.
यंदा अत्यल्प झालेल्या पावसामुळे कापूस व सोयाबीनचे उत्पन्न घटले. त्यातच सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी चार हजार तीनशे रुपयांचा दर मिळत आहे.
भाववाढीची प्रतीक्षा करत बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली. त्यानंतर कापसाला सरासरी आठ हजारांपर्यंत भाव मिळत आहे. परंतु, त्यातून कपाशीचा खर्चही निघाला नाही. दुसरीकडे दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला ११ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. परंतु, सध्या चार हजार तीनशे रुपयेप्रमाणे सोयाबीन विक्री होत आहे.
चार मित्रांनी उभारला नैसर्गिक ऊस उत्पादनाचा ब्रॅंड
मागील वर्षीपासून सोयाबीनच्या दरात सुमारे ७० टक्के घट झाली आहे. काही शेतकरी मागील वर्षीपासून भाववाढीची प्रतीक्षा करत आहेत. सोयाबीन हे या भागातील शेतकऱ्यांचे महत्त्वाचे पीक आहे. अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढेल, या अपेक्षेने सोयाबीनची विक्री केली नाही. हातात पैसे नसल्याने येणाऱ्या हंगामात पेरणी कशी करायची, उसनवारी, कर्ज कशी फेडायची, बी-बियाणे, खते, घरखर्च, मुलींची लग्न, मुलांचे शिक्षण यासाठी पैसे कुठून आणायचे, आदी प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत.
आठवडी बाजारात दिसतोय शुकशुकाट
शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने परिसरातील बाजारपेठेतील ग्राहकही मंदावले आहेत. लग्नसराईचे दिवस असतानाही आठवडी बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे. शासनाने कापसाला १२ हजार रुपये क्विंटल व सोयाबीनला किमान आठ हजार रुपये प्रतीक्विंटल भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.