Soybeans Market :
सोयाबीनचा हंगाम सप्टेंबर महिन्यात सुरू होत आहे. त्यापूर्वीच व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
केंद्र शासनाने सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. त्या तुलनेत सध्या सोयाबीनला ४ हजार रुपयेच भाव मिळत आहे.
हंगामात यापेक्षा कमी भाव राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सोयाबीनचा हंगाम महिनाभरात सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात कमी आलेली आहे. मागच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाने सोयाबीनच्या उत्पादनात कमी आलेली आहे. त्यामुळे मागणी वाढून दरवाढ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात सोयाबीनचे दर ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रुपये क्विंटलदरम्यान स्थिरावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघालेला नाही. दरवाढीची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांना साठवणूक केलेले सोयाबीन विकावे लागले.
यंदा दीड महिन्यापासून ढगाळ वातावरण, सूर्य प्रकाशाचा अभाव, सततचा पाऊस यामुळे सोयाबीनवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे.
त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सोयाबीनच्या दरात हंगामापूर्वीच कमी आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
असे आहेत सोयाबीनचे बाजारभाव (रु. क्विं)
०२ ऑगस्ट : ४१०० ते ४१९९
०५ ऑगस्ट: ४१५० ते ४२६५
०७ ऑगस्ट: ४०५० ते ४१६१
१२ ऑगस्ट : ४१०० ते ४१७७
१४ ऑगस्ट: ४०५० ते ४१५६
१६ ऑगस्ट : ४१०० ते ४१९०
१७ ऑगस्ट: ४०५० ते ४१५३
सोयाबीन घसरणीची कारणे
१. सोयाबीनचे दर डीओसीवर अवलंबून असतात. यावर्षी डीओसीला मागणी नसल्याने भावात कमी आलेली आहे.
२. शिवाय प्लॉटची खरेदी देखील बंद आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची फारशी मागणी नाही.
३. अशा परिस्थितीत तेलाच्या भावात घसरण झालेली आहे. या सर्वांचा परिणाम होऊन सोयाबीनच्या दरात कमी आलेली असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
बाजारात उठाव नाही
सध्या तेलाच्या दरात कमी आहे. डीओसीला मागणी नाही, देशांतर्गत या हंगामात चांगल्या उत्पादनाची शक्यता आहे. बाजारात उठाव नसल्याने सोयाबीनच्या दरात कमी आलेली आहे. - - संजय जाजू, व्यापारी