छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात पाणीटंचाई असताना देखील शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळी मिरचीची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. आता ही मिरचीबाजारात येऊ लागली असून, आमठाणा बाजारात मिरची खरेदीला गुरुवारी सुरुवात झाली. यामध्ये तेजा फोर मिरचीला सर्वाधिक साडेदहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सिल्लोड तालुक्यातील आमठाणा, देऊळगाव बाजार, घाटनांद्रा, धावडा, केळगाव, कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी, करंजखेडा या भागात एप्रिल महिन्यात उन्हाळी मिरचीची यंदा सर्वाधिक लागवड झालेली आहे. आता ही मिरची बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. परिसरात आमठाणा येथे मिरचीची मोठी बाजारपेठ असून येथून आखाती देशात तेजा फोर मिरची पाठविली जाते.
गरुवारी या मिरची मार्केटला सुरुवात झाली. व्यापारी बाळासाहेब इवरे यांनी मिरची काट्याचे उद्घाटन केले. यानंतर मिरची खरेदी सुरू करण्यात आली. यात 'तेजा फोर' वाणाच्या मिरचीला सर्वाधिक १० हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. यावेळी व्यापारी राजू सुसर, नितीन चौधरी, सुभाष लोखडे, बाजीराव मोरे, डॉ. अशोक महाजन, भागीनाथ पवार आदी हजर होते.
शेतकरी समाधानी
आमठाणा येथील बाजारात मिरचीला मागील वर्षी प्रतिक्विंटल ११ हजार रुपये भाव मिळाला होता. यावर्षीही १० हजार ५०० रुपयांचा दर पहिल्याच दिवशी मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. आणखी भाव वाढावा किंवा आहे, तोच टिकून राहावा, अशी उत्पादक शेतकऱ्यांची इच्छा आहे.
केळगावसह आमठाणा परिसरातील मिरचीला यंदा चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा आहे. परिसरात बऱ्याच ठिकाणी मिरची पिकावर कोकडा (थ्रिप्स) रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे भाव टिकून राहतील, अशी आशा आहे. - बाळासाहेब इवरे, मिरची व्यापारी, आमठाण.
हेही वाचा - Success Story दोन एकर केशर आंबा बागेतून उच्चशिक्षित तरुणाला ८ लाखांचे उत्पन्न