Join us

बंद, आंदोलन कुठलेही असू द्या, विंचूर उपबाजाराचे दरवाजे खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2023 12:43 PM

जिल्हाभरात कांदा व्यापाऱ्यांचा आठ दिवसांपासून बेमुदत बंद असताना शेतकऱ्यांची कोंडी होऊ नये म्हणून विंचूरच्या काही व्यापाऱ्यांनी दोन दिवसांपासून कांदा लिलाव पूर्ववत सुरू केले आहेत.

शेतकरी हिताचा दृष्टिकोन समोर ठेवून सुरू केलेल्या आणि अल्पावधीतच जिल्हाभरात नावलौकिक झालेल्या लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजाराने पुन्हा एकदा आदर्श घालून दिला आहे. जिल्हाभरात कांदा व्यापाऱ्यांचा आठ दिवसांपासून बेमुदत बंद असताना शेतकऱ्यांची कोंडी होऊ नये म्हणून विंचूरच्या काही व्यापाऱ्यांनी दोन दिवसांपासून कांदा लिलाव पूर्ववत सुरू केले आहेत. विशेष म्हणजे असोसिएशनच्या बहिष्काराला न जुमानता येथील छोट्या व्यापाऱ्यांनी लिलावात सहभाग नोंदवत वेगळेपण दाखवून दिले.

नाशिक जिल्हाभरासह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तोबा गर्दी केल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. अर्थात लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांसह संचालक पंढरीनाथ थोरे व छोट्या व्यापाऱ्यांमधील सकारात्मक धोरणामुळे विंचूर उपबाजार समिती जिल्हाभरात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

ऐण सणासुदीच्या काळात शेतकरी वर्ग अडचणीत आहे. तसेच कांदा चाळीत सडत असताना लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती संपामुळे सलग दहा दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प झाल्याने लाखो क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची आवक थांबली. जिल्ह्यातील सुमारे साडेपाचशेच्या वर व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा काढल्या. प्रारंभी विंचूर उपबाजारातील व्यापाऱ्यांनाही नोटिसा देण्यात आल्या होत्या. कोट्यवधींची ठप्प झालेली उलाढाल आणि शेतकऱ्यांच्या अडचणी बघता येथील काही व्यापारी व संचालकांमध्ये बैठक होऊन सकारात्मक तोडगा निघाला.

विंचूर उपबाजारात अनंत चतुर्दशीच्या दिवसापासून कांदा लिलाव पूर्ववत सुरू आहेत. नाशिक जिल्हाभरासह इतर तीन जिल्ह्यांतील शेतकरी वर्गाने लिलावासाठी मोठी गर्दी केल्याने महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. शुक्रवारी (दि.२९) अठरा हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन अडीच हजार रुपयांचा भाव मिळाला. ऐन सणासुदीच्या काळात लिलाव सुरू झाल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधान आहे. अमावस्येला सर्वत्र लिलाव बंद असताना विंचूर उपबाजार समितीने मात्र लिलाव सुरू ठेवले. महिनाभरापूर्वीही आंदोलने होत असताना मार्केट खुले होते. बंद कुठलाही असू द्या पण विंचूर मार्केट सुरू राहते, हा संदेश सर्वदूर गेला आहे.

ज्यासाठी केला होता अट्टाहासशासनाने ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याविषयी समिती नेमण्यात येईल असे सांगितल्याने सध्या तरी हा निर्णय रद्द होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ज्या कारणांसाठी संप केला त्यावरच निर्णय होत नसल्याने व्यापारी वर्ग नाराज असल्याचे समजते. लिलाव बंद झाल्यापासून जिल्ह्याच्या विविध भागात पावसानेही दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात प्रतिदिन सुमारे एक ते दीड लाख क्विंटल कांद्याच्या आवकेतून सरासरी २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली; मात्र विंचूर उपबाजारात शेतकयांनी कांदा लिलावास मोठी गर्दी केली आहे. दोन सत्रात लिलाव पार पडत आहेत. विचूर मार्केट नवसंजीवनी ठरले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावचे विंचूर उपबाजार आवर येथे जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद असल्याने १८८३ नग (२१००० क्विं.) उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक होऊन सायंकाळी सात वाजेपर्यंत जवळपास चार कोटी रुपयांचे पुढे व्यापारी बांधवांनी रोख चुकवती करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. विंचूर बाजार समितीचा नावलौकिक वाढवून तीन जिल्ह्यातून आलेल्या कांदा शेतमालाची चांगल्या दराने विक्री केल्याने शेतकरी बांधवांनी व्यापारी वर्ग व बाजार समितीचे विशेष आभार मानले. जिल्ह्यातील संपूर्ण बाजार समित्या बंद असतानाही विंचूर बाजार समिती सुरू असल्याने ग्रामस्थ, कामगार तसेच व्यावसायिक बांधवांनीही बाजार समितीचे विशेष आभार मानले.

कांदा व्यापारी व संचालकांची सकारात्मक बैठक झाली. शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून विंचूर उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरु करण्यात आला आहे. - पंढरीनाथ थोरे, संचालक, लासलगाव बाजार समिती

व्यापाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत; पण सणासुदीमुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे. पावसामुळे कांदा सडत असल्याने लिलाव सुरु होणे गरजेचे होते. - सुरेश मेमाणे, शेतकरी

टॅग्स :कांदामार्केट यार्डमार्केट यार्डबाजारशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनाशिक