आपल्या देशाने तांदळावर लादलेली निर्यातबंदी आणि 'एल निनो' मुळे थायलंडमध्ये भात पिकाच्या झालेल्या नुकसानामुळे नोव्हेंबर २०२३ पासून तांदळाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सध्या हे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहे.
वाशिम येथील धान्य विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२३ मध्ये चिन्नोर, आंबेमोहोर, बासमती यासह इतरही प्रजातीच्या तांदळाचे दर पूर्णतः नियंत्रणात होते. त्यानंतर मात्र दरात सातत्याने वाढ होत गेली. वाशिम शहर तथा तालुक्यातील नागरिकांकडून चिन्नोर, कालीमूंछ आणि आंबेमोहोर या प्रजातीच्या तांदळाची सर्वाधिक मागणी आहे.
साधारणतः ७ महिन्यांपूर्वी ५५ ते ६० रुपये प्रतिकिलो असलेले चिन्नोरचे दर सध्या ७२ ते ७५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. आंबेमोहोरचे दर ७५ ते ८० रुपये; तर बासमतीचे दरही प्रतिकिलो ८० रुपयांपेक्षा अधिक झाले आहेत.
जुना चिन्नोर, कोलम, आंबेमोहोरला पसंती
वाशिम परिसरात जुना चिन्नोर, कोलम आणि आंबेमोहोर तांदळाला सर्वाधिक पसंती दिली जाते. यासह आंबेमोहोर आणि बासमती तांदूळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्याही मोठी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत सर्वच प्रकारच्या तांदळाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. त्यातच चिन्नोर तांदळाच्या दरात सर्वाधिक वाढ झालेली आहे. एका आठवड्यात या तांदळाचे दर प्रतिक्विंटल ६०० ते ७०० रुपयांनी वाढले आहेत. - करण सचदेव, धान्य विक्रेता, वाशिम
अधिक भाववाढीमागे तापमानही कारणीभूत
• २०२४ सुरू होण्यापूर्वी सर्वच प्रकारच्या तांदळाचे भाव आटोक्यात होते. मात्र, नंतरच्या काळात त्यात सातत्याने वाढ होत गेली.
• यंदा मार्च महिन्यातच कडक उन्ह तापायला लागल्याने तांदळातील ओलावा कमी झाला. त्याचा थेट परिणाम होत तांदळाच्या दराने विक्रमी पातळी गाठली.
• चिन्नोर तांदळाच्या दरात प्रतिक्विंटल तब्बल १,८०० रुपये; तर अन्य तांदळाच्या दरात प्रति क्विंटल साधारणतः ३०० ते ६०० रुपयांनी वाढ झाली.
तांदळाचे प्रकार व सध्याचे दर (प्रतिकिलो)
तांदळाचे प्रकार | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर |
चिन्नोर | ७२ | ७५ |
कोलम | ६२ | ६५ |
आंबेमोहर | ७५ | ८० |
बासमती | ८० | १२० |
हेही वाचा - गूळ शेंगदाणे नियमित सेवन केल्यास अॅसिडिटीपासून होते सुटका; हाडेही होतात मजबूत