ऐन दिवाळीत घाऊक बाजारात साखरेच्या दरात घसरण झाली असून, प्रतिक्विंटल ३,४५० रुपयांपर्यंत दर खाली आला आहे. त्यामुळे नोव्हेंबर-२०२४ चा विक्री कोटाही कमी झाला आहे.
पुढच्या महिन्यात २२ लाख टन साखर विक्री करावी लागणार असून, ऑक्टोबरपेक्षा तीन लाख टनाने कोटा कमी झाला आहे. यंदा साखरेला मागणी चांगली राहिल्याने दरही चांगला मिळत होता.
सप्टेंबरपर्यंत सरासरी ३,६५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत साखरेचा दर होता. मात्र, सध्या ३,४५० रुपयांपर्यंत खाली आला आहे. शासनाने ऑक्टोबरमध्ये २५ लाख टन साखर विक्रीचा कोटा साखर कारखान्यांना दिला होता.
मात्र, त्यातील २० टक्के साखर अजूनही कारखान्यांकडे शिल्लक आहे. तोपर्यंत, नोव्हेंबरचा कोटा आला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये २३ लाख टन कोटा दिला होता, त्यापेक्षाही यंदा एक लाख टनाने कमी दिला आहे.
मागणी कमी झाल्याने कोटा कमी केला आणि दरही घसरले आहेत. सध्या घाऊक बाजारात ३,४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. मागील तीन महिन्यांतील साखरेच्या दराची सरासरी काढून त्यातील ८५ टक्के रक्कम बँका कारखान्यांना ऊस बिलापोटी देतात.
तीन महिन्यांचा सरासरी दर आणि बँकांकडून मिळणारी उचल पाहिली तर कारखान्यांना तीन हजार रुपये मिळू शकतात. त्यामुळे अनेक कारखान्यांपुढे पेच निर्माण होऊ शकतो.
दरवाढीच्या भीतीने साखरेचा साठाश्रावण व गणेशोत्सवाच्या काळात साखरेला तेजी होती, आगामी दसरा व दिवाळीत साखर आणखी उसळी घेणार, अशी भीती व्यापाऱ्यांना वाटल्याने त्यांनी कोटा कमी केला, त्याचा परिणाम सध्या दिसत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
केंद्र सरकारने साखरेचा किमान दर व इथेनॉलच्या दरात वाढ केली तरच कारखाने तग धरू शकतात. साखरेला चांगले पैसे मिळाले तरच शेतकऱ्यांनाही उसाचे पैसे वेळेत देता येतात. याबाबत 'इस्मा'ने केंद्राकडे केलेल्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा. - पी. जी. मेढे (साखर उद्योगातील अभ्यासक)