परभणी शहरातील बाजारपेठेत मागील काही दिवसांपासून लिंबाला मागणी वाढली आहे. त्यामुळे लिंबाचे भावही वधारले आहेत. बुधवारी गांधी पार्क, महाराणा प्रताप चौक, क्रांती चौक परिसरात लिंबू ६० रुपये प्रति किलोने विक्री होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे गृहिणींची मोठी अडचण झाल्याचे दिसून येत आहे. लिंबू हे फळ आरोग्यासाठी लाभदायी असून, स्वयंपाकगृहात लिंबाशिवाय गृहिणींचे काम सहसा जमत नाही. पदार्थामध्ये लिंबाचा वापर केला जात असताना जेवणानंतर लिंबू आणि पाणी पिण्याची कित्येकांची सवय आहे. त्यातच आठ दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमान वाढत आहे.
लिंबाऐवजी आता आमसूल परवडले
लिंबूपाणी पिणाऱ्यांनाही आता जरा विचारच करावा लागत आहे. कारण उन्हाळ्यात लिंबू सरबताचे दरही वाढणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लिंबाऐवजी आता आमसूल परवडले असेच म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
बाजारात आताच लिंबाचे दर ६० रुपये किलो आहेत. पुढील महिन्यात उन्हाचा तडाख्यामुळे लिंबाचे दर आणखी वधारण्याची शक्यता आहे.
परजिल्ह्यातूनच लिंबाची आवक
परभणीसह जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आवश्यक तेवढी लिंबाची लागवड झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्याची गरज भागवताना परजिल्ह्यातून लिंबाची आवक जास्त होत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे लिंबाचे दरही वाढले आहेत. त्याचबरोबर कृषी विभाग व शासन प्रयत्न करून फळबाग लागवडीमध्ये लिंबाचा समावेश करीत आहे. मात्र, सीताफळ, संत्रा, मोसंबी या फळपिकांची जास्त लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
प्रति किलो ६० रुपयांवर
हिवाळ्यात लिंबूचे दर नियंत्रणात होते. मात्र, तापमानात जसजशी वाढ होत आहे, तसतशी लिंबांच्या भावातही वाढ होत आहे. परभणी शहरातील गांधी पार्क, क्रांती चौक, महाराणा प्रताप चौक, गणपती चौक यासह ग्रामीण भागातील आठवडी बाजारात लिंबाचे भाव वधारल्याचे दिसून आले. प्रति किलो ६० रुपयांवर लिंबाचे भाव पोहोचले आहेत. त्यामुळे ग्रहिणींना लिंबाचा वापर करताना हात आखडता घ्यावा लागत आहे.
राज्याच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये आज लिंबूला मिळालेला दर
शेतमाल : लिंबू
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
22/02/2024 | ||||||
अकलुज | --- | नग | 6500 | 1 | 2 | 2 |
श्रीरामपूर | --- | क्विंटल | 7 | 1000 | 1800 | 1400 |
राहता | --- | क्विंटल | 6 | 2000 | 8000 | 5000 |
पुणे | लोकल | क्विंटल | 111 | 400 | 3400 | 1900 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 38 | 8000 | 9000 | 8500 |