Join us

बाजारात उन्हाळी मूग दाखल; दर ही समाधानकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 9:08 AM

बाजारात आवक ही अधिक मात्र दर योग्य असल्याने शेतकरी बांधवांना दिलासा

यंदाच्या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी मुगाची लागवड केली होती. हा मूग चांगलाच भाव खात असून, बाजार समित्यांत या शेतमालास ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षाही अधिक दर मिळत आहे. त्यामुळे उन्हाळी मुगाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे दिसते.

वाशिम जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळी हंगामात जवळपास ८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती. त्यात उन्हाळी मूग या पिकाचे क्षेत्र लक्षणीय होते. मधल्या काळातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीने या पिकांना मोठा फटका बसला. तथापि, काही ठिकाणी या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यात मुगाला चांगलाच दर मिळू लागला आहे. बाजार समित्यांत सरासरी कमाल ७ हजार ५०० क्विंटलपर्यंतचे दर मुगाला मिळत असल्याचे सोमवारी बाजार समित्यात दिसले.

सोमवारी दोन हजार क्विंटलहून अधिक मुगाची आवक

बाजार समित्यांत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार ६ मे रोजी शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यात मुगाची आवक दोन हजारांपर्यंत होती. वाशिम बाजार समितीत १८०० क्विंटल, तर कारंजा बाजार समितीत १३० क्विंटल मुगाची आवक या दिवशी झाली होती. इअतर बाजार समित्यांत मात्र मुगाची फारशी आवक दिसली नाही.

जिल्ह्यात बाराशे हेक्टरवर मुगाची पेरणी

• यंदाच्या उन्हाळी हंगामात जिल्ह्यात आठ हजारांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. त्यात ज्वारी, मुग आणि भुईमुग या पिकांचे क्षेत्र लक्षणीय होते. जिल्ह्यात सहाही तालुक्यात मिळून बाराशे हेक्टरपेक्षाही अधिक क्षेत्रात शेतकऱ्यांनी उन्हाळी मुगाची पेरणी केली होती.

• आता या पिकाची काढणी जवळपास आटोपली असून, बाजार समित्यांत उन्हाळी मुगाची आवकही सुरू आहे.

उडीद नऊ हजारांच्या घरात, आवक मात्र नगण्य

उन्हाळी उडिदालाही चांगला दर बाजार समित्यांत मिळत आहे. सोमवारी वाशिमच्या बाजार समितीत उडिदाला प्रती क्विंटल कमाल ८ हजार ८०० रुपयांचा दर मिळाला. तथापि, या पिकाची जिल्ह्यात फारशी लागवड नसल्याने बाजारात आवकही नगन्य आहे. वाशिमच्या बाजार समितीत केवळ ७० क्विंटल उडिदाची आवक झाल होती.

मुगाला कोठे किती दर (रुपये प्रती क्विंटल)

वाशिम - ७६५५

कारंजा - ७२९०

मानोरा - ७७००

मं.पीर - ७६३५

हेही वाचा - काय ते गार्डन, काय तो मंडप; शेतकरी जावई असलेल्या लेकीच्या लग्नाला शेतात हिरवळ

टॅग्स :बाजारपीकशेतीशेतकरीमार्केट यार्डमार्केट यार्ड