जळगाव : खान्देशातील ठोक पद्धतीने खरेदी, दर्जेदार उत्पादनाला अपेक्षित भाव नसल्याने स्थानिक लिंबू उत्पादकांना (Lemon Farmers) आता सुरतच्या मार्केटने संधी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्रापेक्षा दुप्पट दर मिळत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश लिंबू उत्पादकांनी आता गुजरातची वाट धरली आहे. त्यामुळे गुजरातकरांच्या थाळीत खान्देशसह ग्रामीण महाराष्ट्रातील लिंबूने जागा घेतली आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागात नगनिहाय लिंबूची विक्री (Lemon Market) होते. शहरी भागात मात्र किलोने विक्री केली जाते, तसेच शहरी भागात उत्पादकांकडून वजननिहाय लिंबूचे दर निश्चित केले जातात. ग्रामीण महाराष्ट्रात मात्र 'ठोक' पद्धतीने उत्पादकांकडून खरेदी केली जाते. त्यामुळे बहुतांशी उत्पादकांनी दर्जेदार लिंबूसाठी आता शहरी भागाला पसंती द्यायला सुरुवात केली आहे. त्यात महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातच्या मार्केटमध्ये (Surat Lemon Market) लिंबूला दुपटीने दर मिळत आहे.
दररोज २ हजार कॅरेट रवाना
नंदुरबार, धुळे, जळगावच्या चाळीसगाव, एरंडोल, भडगाव, पाचोरा, पारोळा, धरणगाव भागात मोठ्या प्रमाणावर लिंबूचे उत्पादन घेतले जाते. या भागात 'कागदी' अर्थात साई सरबती आणि फुले सरबती वाणांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. लिंबूचे उत्पादन हाती आल्यानंतर त्याची तीन पद्धतीने छाननी होते. दर्जेदार, मध्यम व हलक्या स्वरूपाचे अशी उत्पादनाची विभागणी केल्यानंतर प्रतिकॅरेट २० किलो लिंबू भरले जातात. त्यानंतर दर्जेदार आणि मध्यम दर्जाच्या लिंबूसाठी गुजरातच्या मार्केटचा आधार घेतला जातो. हाच प्रवास सध्या सुरू असून, खान्देशातून दररोज २ हजार कॅरेट रवाना होत असल्याचे उत्पादकांनी सांगितले.
असे आहेत दर (प्रति कॅरेट)
सुरत आणि महाराष्ट्र या दोन्ही बाजारपेठांमधल्या बाजारभावाची तुलना केली असता दर्जेदार लिंबाला कॅरेटमागे सुरत बाजारात 2400 रुपये, तर इतर बाजारांमध्ये 1700 रुपये, मध्यम लिंबाला सुरत बाजारात 02 हजार रुपये तर इतर बाजार बाजारात 1300 रुपये, हलका लिंबूला सुरत मार्केटमध्ये 1600 रुपये, तर इतर बाजारात 1200 रुपये दर मिळतो आहे. जर लिंबाच्या क्विंटलचा दर पाहिला असता आज श्रीरामपूर बाजारात 7000 रुपये, पुणे बाजारात 03 हजार 200 रुपये, पुणे मोशी बाजारात 09 हजार रुपये आणि मुंबई बाजारात 3200 रुपये दर मिळतो आहे.