नवी मुंबई : शासनाने तांदूळ निर्यातीवरील निबंध कमी केले आहेत. यामुळे बाजारभावात ४ ते ७ टक्के वाढ झाली आहे; परंतु यावर्षी नवीन पीक चांगले असून, हे पीक बाजारात आल्यानंतर दर पुन्हा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सप्टेंबरमध्ये तांदूळ निर्यातीवर निर्बंध आणले आहेत. यामुळे एसएलओ व जुना बासमती तांदळाच्या दरामध्ये ७ टक्के वाढ झाली. नवीन बासमतीचे दर ४ टक्के वाढले असून, कोलमच्या दरामध्ये ४ टक्के घट झाली आहे.
बाजार समितीमध्ये बासमती तांदूळ ५८ ते ९५ रुपये किलो दराने विकला जात आहे. साधा तांदूळ ३० ते ६० रुपये दराने विक्री होत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज सरासरी १५०० ते १८०० टन तांदळाची आवक होते.
यामध्ये सर्वसाधारण तांदळाची आवक १२०० ते १३०० टन होते. बासमती तांदूळ १२५ ते १६० टन आवक होत असते. नियमित वापर होणाऱ्या तांदळाचा सर्वाधिक खप होत असतो.
देशभरातून येतो तांदूळमुंबई बाजार समितीमध्ये पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक व इतर ठिकाणावरून तांदळाची आवक होत असते. बाजार समितीमध्ये सर्व धान्यामध्ये सर्वाधिक विक्री तांदळाचीच होत असते.
तांदळाचे बाजारभाव प्रतिकिलो
प्रकार | बाजारभाव |
बासमती | ५८ ते ९५ |
एसएलओ | ३२ ते ४१ |
सर्वसाधारण तांदूळ | ३० ते ६० |
कोलम | ४० ते ७० |
मोगरा | ३० ते ४० |
दुबार | ३९ ते ४८ |
तिबार | ४३ ते ६० |
तांदळाचा पुरेसा साठा आहे. यावर्षी पीकही चांगले झाले आहे. निर्यातीचे निर्बंध कमी झाल्यामुळे काही प्रमाणात दर वाढले आहेत. आवक चांगली होत असून, या हंगामातही तांदळाची आवक चांगली होणार असल्यामुळे दर नियंत्रणातच राहतील. - नीलेश वीरा, संचालक, धान्य मार्केट