तासगाव : तासगाव बाजार समितीत सोमवारी सहायक निबंध रंजना बारहत्ते यांनी बेदाणा उधळणीची पाहणी केली. बारहत्ते यांच्या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान ८० टक्के बेदाणा उधळण थांबली. मात्र यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी उधळणीवर तीव्र संताप व्यक्त केला.
या उधळणीचा वस्तुनिष्ठ अहवाल दुय्यम निबंधक सांगली यांना पाठवणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. यावेळी निमणीचे माजी उपसरपंच आर. डी. पाटील उपस्थित होते.
तासगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा उधळण करून अडते व व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठी लूट होत असल्याबाबत लोकमतमधून आवाज उठवला होता.
त्याची दखल घेत मनसेचे अमोल काळे जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार केली होती. यासंबंधी बेदाणा उधळणीची सोमवारी १२ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहायक निबंधक रंजना बारहत्ते यांनी पाहणी केली.
नेहमी सौदे काढताना बेसुमार पद्धतीने उधळला जाणारा बेदाणा सोमवारी व्यापारी बॉक्समधून मूठ भरून घेत ती मूठ परत बॉक्समध्ये टाकत असल्याचे चित्र दिसले. इतरवेळी हा बेदाणा उधळून लोखंडी जाळीत सांडला जात होता.त्याची तूट मनमानी पद्धतीने धरली जात होती.
मात्र सहायक निबंधकांच्या पाहणीमुळे व्यापारी हबकले होते. काही जणांनी सौद्यास दांडी मारली होती. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी बेदाणा उधळणीवर संताप प्रतिक्रिया दिल्या. असून उधळण पूर्णपणे बंद होण्याची मागणी त्यांनी निबंध सहायक निबंधकांकडे केली आहे.
यावेळी बारहत्ते यांनी सर्व बेदाणा उधळणीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ही घेतल्या या सर्व प्रतिक्रिया व पाहणी यांचा वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वस्तुनिष्ठ अहवाल हवा
सहायक निबंधकांनी प्रत्यक्ष सौदे सुरू असताना भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित असणाऱ्या तासगाव, मिरज, मंगळवेढा कवठेमहांकाळ व कर्नाटकातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या अडचणी व व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. सौद्या वेळी उधळलेल्या बेदाण्याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. जिल्हा उपनिबंधक यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर व्हावा अशी अपेक्षा निमणीचे माजी उपसरपंच आर. डी. पाटील यांनी व्यक्त केली.