आसाम व पश्चिम बंगाल या दोन मोठ्या चहा उत्पादक राज्यांना यंदा प्रतिकूल हवामानाचा फटका बसला आहे. यंदाच्या चहा उत्पादनात आसाममध्ये २० तर पश्चिम बंगालमध्ये ४० टक्के उत्पादन घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम चहाच्या किमती तसेच निर्यातीवर होण्याची चिन्हे आहेत.
टी असोसिएशन ऑफ इंडिया (टीएआय) ने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये सरासरीच्या तुलनेत ५० ते ८० टक्के तर आसाममध्ये सरासरीच्या तुलनेत केवळ १० ते ३० टक्के पाऊस झाला आहे. त्याचबरोबर अचानक उष्णता वाढल्यामुळे चहा उत्पादनासाठी पोषक वातावरण तयार झाले नाही. या दोन्ही राज्यातील पिकांना याचा फटका बसल्यामुळे यंदा दोन्ही राज्यातील सरासरी उत्पादन ३० टक्के घटणार आहे.
सध्या दिवसा जास्त पाऊस आणि सूर्यप्रकाशाचा अभाव या हवामानामुळे सुद्धा दोन्ही राज्यांच्या पीक उत्पादनामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. एप्रिल महिन्यामध्ये झालेली गारपीट व अतिवृष्टी यामुळेही चहा पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये पश्चिम बंगालचे उत्पादन ४० टक्के कमी आहे, तर आसामचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के कमी झाले आहे.
६० दशलक्ष किलोग्रॅमची घट भारतातील चहाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत अंदाजे ६० दशलक्ष किलोग्रॅमने कमी होण्याची शक्यता आहे. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्येही चहाच्या उत्पादनात ६ दशलक्ष किलोग्रॅमची घट झाली होती. जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत देशात ८०७.५ दशलक्ष किलोग्रॅम, तर जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत देशातील उत्पादन ८०१.२३ दशलक्ष किलोग्रॅम नोंदले गेले.
काय होणार परिणाम यावर्षी सर्वोच्च दर्जाच्या चहाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम निर्यात घटण्यावर होईल. चहाचे उत्पादन कमी झाल्यामुळे देशांतर्गत चहाचे दरही वाढू शकतात.
पश्चिम बंगाल व आसाम येथील पिकाच्या नुकसानीमुळे उत्पादन घटणार असून उत्पादकांच्या वर्षभराच्या महसुलावर नक्कीच परिणाम होणार आहे. - राजेश शहा, अध्यक्ष, सांगली टी असोसिएशन