वाढत्या उन्हाच्या झळांमुळे कलिंगडासह पाणीदार फळांना मागणी वाढली आहे. आवक वाढल्याने ग्राहकांचा रसदार फळांचा आस्वाद घेण्याकडे कल वाढला आहे. बाजारात सध्या खरबूज आणि कलिंगडाच्या मागणीत वाढ झाली आहे.
परंतु, आवक वाढल्याने कलिंगड आणि खरबुजाचे बाजारभाव घसरले आहेत. याचा फटका फळ उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. इतर फळांच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी घट झाली आहे. खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले उपबाजारात करमाळा, धुळे या जिल्ह्यांसह आंबेगाव आणि खेड तालुक्यांतून कलिंगडाची आवक वाढली आहे.
सध्या कलिंगडाचे बाजारभाव १० ते १५ रुपये किलो आहेत तर खरबूजलादेखील १५ ते २० रुपये किलो असा दर मिळत आहे. सध्या किरकोळ बाजारात कलिंगड ३० ते ४० रुपये किलो तर खरबूज ४० ते ५० रुपये किलो बाजारभावाने विक्री होत आहे.
वाढत्या उष्णतेमुळे आणि सध्या रमजानच्या उपवासामुळे कलिंगड, खरबूज, आंबे, मोसंबी, डाळींब, पपई, काळी आणि हिरवी द्राक्षे या मधूर चव असणाऱ्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने बाजारात या फळांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
२०० क्विंटल कलिंगडांची दररोज आवक बाजारभाव (प्रतिकिलो)
कलिंगड १० ते १५ रुपये
खरबूज १५ ते २० रुपये
द्राक्षे २५ ते ३० रुपये
उन्हाची तीव्रता लक्षात घेता ज्या शेतकऱ्यांकडे सध्या कलिंगड, खरबूज आहे अशा शेतकऱ्यांना या दरवाढीचा फायदा होणे अपेक्षित आहे. परंतु, बाजारात आवक वाढल्याने फळांचे दर उतरले आहेत. लागवड केल्यानंतर ६५ दिवसांत फळ तयार होते. बाजारात मोठ्या प्रमाणात कलिंगडांना मागणी आहे. - महेंद्र गोरे, संचालक, बाजार समिती, खेड