Join us

व्यापाऱ्यांची भरती नको म्हणून शेतकऱ्यानं हे जुगाड करून विकल्या मेथीच्या पेंड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 9:21 AM

म्हाळप्पा कोळेकर हे शेतकरी मधल्या व्यापाऱ्यांना टाळून थेट ग्राहकांपर्यंत भाजी विकत आहेत.

सोलापूर : शहरापासून वाघोली गावचे अंतर ते ३५ किलोमीटरचे. या गावातील शेतात पिकलेली मेथीची ताजी भाजी शहरातील नागरिकांना थेट मिळत आहे. म्हाळप्पा कोळेकर हे शेतकरी मधल्या व्यापाऱ्यांना टाळून थेट ग्राहकांपर्यंत भाजी विकत आहेत.

एका पेंडीला चार रुपये खर्च असताना दोन रुपयाला कशी विकू? असा सवाल त्यांनी उपस्थित करत उत्तरही शोधले. दोन रुपये, अडीच रुपये, तीन रुपये या किमतीत कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथीची पेंडी घेतली जाते.

यामुळे शेतकऱ्याला तर फायदा होत नाही व ग्राहकांनाही होत नाही. फक्त मधल्या मध्येच पैसे जातात. म्हणून शेतातून भाजी काढल्यानंतर थेट ग्राहकांना आणून विकण्याचा निर्णय कोळेकर यांनी घेतला.

पाच वर्षांपूर्वी कार घेतली होती. याच कारमध्ये भाजी आणून रस्त्यावर थांबून भाजी विकतात. या पद्धतीने व्यवसाय केल्यास ग्राहकांसोबत शेतकऱ्याचाही फायदा होतो.

एक पेंडी तयार शेतातून काढण्यासाठी शेतमजुराला एक रुपया तर वाहतुकीसाठी दोन ते तीन रुपये द्यावे लागतात. एकाच पेंडीसाठी तीन ते चार रुपये खर्च येत असताना बाजार समितीत दोन ते तीन रुपयाला एक पेंडी कशी विकू? असा विचार आल्याने गाडी घेऊन थेट बाजारात भाजी विकण्याचा निर्णय घेतल्याचे कोळेकर यांनी सांगितले.

एका पेंडीमागे ५ ते सहा रुपयांचा फायदाबाजार समितीत जाऊन भाजी विकल्यास फक्त दोन रुपये भाव मिळत होता. प्रत्यक्षात एक पेंडी तयार करायला तीन ते चार रुपये लागतात. ही पेंडी ८ ते १० रुपयास विकल्यास पाच ते सहा रुपयांचा फायदा होतो. ग्राहकांनाही स्वस्त आणि ताजी भाजी मिळते असे कोळेकर यांनी सांगितले.

मेथीची पेंडी घेऊन बाजार समितीत गेलो होतो. फक्त दोन रुपये भाव मिळाला. म्हणून मीच भाजी विकण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदाच थेट भाजी विकत असून हा मार्ग चांगला आहे. मला चांगला फायदा होत असून शहरातील ग्राहकांना ताजी भाजी मिळत आहे. त्यामुळे भविष्यात शेती तर करायचीच, सोबतीला भाजी विक्रीचा व्यवसायही करायचा हे ठरवलं आहे. - म्हाळप्पा कोळेकर, शेतकरी

टॅग्स :शेतकरीशेतीसोलापूरबाजारभाज्यापीकमार्केट यार्ड