विवेक चांदूरकर
ठोक बाजारात शेतकऱ्यांना ३० ते ३५ रूपये किलोने लिंबाची विक्री करावी लागत आहे. मात्र, बाजारात ८० ते १०० रूपये किलोने ग्राहकांना लिंबू खरेदी करावे लागत असल्याने व्यापाऱ्यांना प्रती किलो दुपटीने फायदा होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सिंचनाची सोय असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लिंबू बागा उभ्या केल्या आहेत. लिंबाची लागवड केल्यानंतर ५ वर्षापर्यंत झाडांचे संगोपन करावे लागते. त्यानंतर फळधारणा होते. एक झाड १५ वर्षे उत्पादन देते. दरवर्षी शेतकऱ्यांना लिंबाचे उत्पादन घेण्याकरिता वर्षभर फवारणी करावी लागते.
तसेच झाडांना खत द्यावे लागते. त्याचा खर्च एका एकराला ३० ते ३५ हजार रूपये येतो. झाडांचे संगोपन करण्याकरिता वर्षभर मजूर ठेवावे लागतात. झाडांना पाणी द्यावे लागते. याकरिता ही बराच खर्च येतो. लिंबाचे दर सध्या भरमसाठ वाढले असले तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही.
गावापासून तर बाजारापर्यंत विक्रीसाठी नेण्याकरिता प्रवासभाडे ही दोन हजार रूपयांपेक्षा जास्त द्यावे लागते. सध्या तालुक्यात शेतकरी ३० ते ३५ रूपये किलोने लिंबाची विक्री करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. बाजारात ग्राहकांना ८० ते १०० रूपये किलोने ग्राहकांना लिंबू खरेदी करावे लागत आहे.
त्यामुळे व्यापारी मालामाल होत आहेत. अनेक भाजीविक्रेते पाच रूपयांना एक व दहा रूपयांना तीन लिंबाची विक्री करतात. ग्राहकांना मात्र १०० रूपये किलोने लिंबाची खरेदी करावी लागत आहे.
५ तासांची मजुरी ३०० रुपये
सध्या उन्हाळा असल्यामुळे मजूर सकाळी १२ वाजेपर्यंतच काम करतात. त्यांना पाच तास काम करण्याची मजुरी ३०० रुपये द्यावी लागते. एक मजूर ३० ते ३५ किलो लिंबू तोडतात. लिबाला ३० ते ३५ रुपये भाव मिळत असल्याने, १० किलो लिंबाचे पैसे मजुरांनाच द्यावे लागतात.
ठोक बाजारातील दर (किलो)
३० ते ३५ रूपये
बाजारात दर (किलो)
८० ते १०० रूपये
नांदुरा येथे विक्री
पिंपळगाव राजासह आजूबाजूच्या भागातील शेतकरी नांदुरा येथे लिंबाची विक्री करतात. खामगाव येथील ठोक बाजारात जास्त प्रमाणात असले तर लिंबाची खरेदी करण्यात येत नाही. तसेच जास्त प्रमाणात लिंबू विक्रीला आले तर भाव पडतात. त्यामुळे शेतकरी नांदुरा येथे लिंबाची विक्री करतात.
लिंबाचे झाड लावण्यापासून उत्पादन घेण्यापर्यंत हजारो रूपये खर्च करावे लागतात. दरवर्षी फवारणी व खत देण्याकरिता ३० ते ३५ हजार रूपये खर्च येतो. लिंबू बाजारात नेण्याकरिता ही बराच खर्च येतो. त्यानंतरही भाव कमी मिळतात. - विनोद सातव, लिंबू उत्पादक शेतकरी, पिंपळगाव राजा.
हेही वाचा - Success Story शाळा सांभाळून पत्नीच्या मदतीने शिक्षक शेतकऱ्याने फुलवली जांभळाची बाग