कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ बाजारात फळांचा राजा हापूस आंबा बुधवारी रात्री दाखल झाला. नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमधून पाच ते सहा पेट्या आल्या आहेत. सहा डझनाच्या पेटीचा दर चार हजार रुपये आहे. अक्षय तृतीयेला आंब्यांची आवक वाढण्याबरोबरच दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोकणातील हापूस आंब्याची चव चाखायला सर्व ग्राहक नेहमीच आसुसलेले असतात. हापूस आंब्याचा हंगाम मार्च महिन्यात सुरू होऊन जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो. कोकणातील काही शेतकऱ्यांकडे डिसेंबर, जानेवारी महिन्यामध्येच हापूस आंबा तयार होतो. त्यामुळे बाजारात या महिन्यात तुरळक आंबा येण्यास सुरुवात होते.
या हंगामातील हापूस आंबा नवी मुंबई येथील एपीएमसीतील फळ बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. याच मार्केटमधून कल्याणच्या एपीएमसीमध्ये बुधवारी आंब्याच्या सहा डझन पेट्या आल्या आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील शेतकऱ्यांना कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये आंबा घेऊन येणे सहसा शक्य होत नाही. त्यामुळे सुरुवातीला नवी मुंबई येथील मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी येतो.
सध्या कल्याणच्या एपीएमसीमध्ये आलेले आंबे नमुना म्हणून दाखल झाले आहेत. अक्षय तृतीयेच्या दहा ते पंधरा दिवस आधी आंब्याची आवक जास्त असते. शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता असल्याचे एपीएमसी मार्केट मुख्य इंचार्ज निवृत्ती चकोर यांनी सांगितले.