होळी झाली की आंब्यांचा सीझन सुरू होतो. नगर शहरात हापूस, पायरी, केशर, बदाम, लालबाग, तोतापुरी अशा जातींचे आंबे दाखल होऊ लागलेत. पण कोकणचा हापूस पाहिजे तसा बाजारात आला नाही. त्यामुळे अजूनही आंब्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत.
सध्या नगरमध्ये रत्नागिरी हापूस आणि देवगड आंब्यांचे आगमन झाले आहे. रत्नागिरी हापूस ६०० ते १,२०० रुपये डझन तर देवगड ६०० ते १,००० रुपये डझन आहे.
याव्यतिरिक्त कर्नाटक, मद्रास, केरळ आणि बंगळुरूहून आंबे दाखल झालेत. दरवर्षी नगरमध्ये केशरला सर्वाधिक पसंती असते, त्यानंतर हापूस, लालबाग, बदाम जातींच्या आंब्यांना मागणी असते.
आंबे खाण्याचा खरा हंगाम म्हणजे मे महिना. पण आता डिसेंबर-जानेवारी महिन्यातच काही ठिकाणी आंबे बाजारात दिसून येतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून बऱ्यापैकी आंब्यांची आवक वाढलेली असते.
त्यावेळी ग्राहकांची मागणी देखील वाढत असते. पण सध्या खराब हवामानाचा परिणाम ग्राहकांवर झाल्याचे दिसून येत आहे. तसेच काही लोक अक्षयतृतीया होईपर्यंत आंबे खाण्याचे टाळतात. मागणीच नसल्याने शहरातील फळांच्या स्टॉलवर आंब्यांची गैरहजेरी दिसत आहे
कार्पेटच्या आंब्यांवर प्रशासनाची नजर
कर्नाटकमधून येणारे आंबे देखील रत्नागिरी हापूस आणि देवगडसारखे दिसतात. त्यामुळे आंबे खरेदी करताना सावधानता बागळण्याची गरज आहे. आपण खरेदी करत असलेले आंबे ओरिजनल हापूस किंवा देवगड आहेत, हे देखील पडताळून पाहण्याची गरज आहे. कार्पेट टाकलेले आंबे आपल्या शरीराला घातक असतात. अशा आंब्यांवर अन्न व औषध प्रशासनाने बंदी घातलेली आहे.
अक्षयतृतीयानंतर बहुतांश लोक आंबे खातात. त्यामुळे आंब्यांना पाहिजे तशी मागणी नाही. शाळांना सुट्टया लागल्यानंतर आणि लग्नसराई सुरू झाल्यानंतरच आंब्यांची मागणी वाढू शकते. - संदीप बेलेकर, फळ विक्रेते
कोकणातील आंबे अधिक रसाळ आणि चवदार असतात. त्यामुळे कर्नाटकमधील आंब्यापेक्षा रत्नागिरी हापूस आणि देवगड आंब्यांना ग्राहकांची पसंती असते. - राहुल लोढा, हापूस विक्रेते
दुकानदारांकडील आंब्याचे दर
केशर - २५० ते ३००
बदाम - १५० ते २००
लालबाग - १८० ते २२०
हापूस - ३०० (कर्नाटक)
हापूस - ६०० ते १,२०० (रत्नागिरी)
पायरी - ६०० ते १,००० (कोकण)