कोल्हापूर : साखरेचा किमान विक्री दर वाढविण्याबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी दिली.
ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या (एस्टा) साखर परिषदेसाठी संजीव चोप्रा शनिवारी मुंबईत आले होते. ते म्हणाले, 'आम्ही साखरेचे किमान विक्री दर वाढविण्याच्या प्रस्तावावर चर्चा करत आहोत. लवकरच निर्णय घेऊ.
त्याचप्रमाणे उसाच्या एफआरपीतही वाढ करण्यात येईल. २०१९ पासून उसाच्या किमान विक्री दरात वाढ झालेली नाही. तो ३१०० रुपये प्रतिक्विंटलच आहे. या दरात वाढ करुन तो ४२०० रुपये प्रतिक्विंटल करावा अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघासह साखर उद्योगातील विविध संघटनांची आहे. या पार्श्वभूमीवर चोप्रा यांचे हे आश्वासन महत्त्वाचे आहे.
उसाखालील क्षेत्रात वाढ
२०२४-२५ च्या हंगामात (ऑक्टोबर ते सप्टेंबर) उसाखालील क्षेत्र वाढलेले आहे. गेल्यावर्षी ५७ लाख हेक्टर क्षेत्रात ऊस उपलब्ध होता. येत्या हंगामात हे क्षेत्र ५८ लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे.
इथेनॉलसाठी पाण्याची गरज किती?
तत्पूर्वी, साखर परिषदेत बोलताना चोप्रा यांनी म्हणाले की, इथेनॉलचे उत्पादन उसापासून तसेच अन्नधान्यापासून घेतले जाते. यातील इथेनॉल निर्मितीसाठी कोणत्या अन्नधान्याला पाण्याची गरज जादा लागते यावर कृषी मंत्रालय संशोधन करीत आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार मका आणि तांदळाच्या इथेनॉलपेक्षा कमी पाण्याची आवश्यकता उसापासून इथेनॉल निर्मितीसाठी लागते, असेही त्यांनी सांगितले.
साखरेचा किमान विक्री दर ४२०० रुपये प्रतिक्विंटल केल्याशिवाय आगामी गाळप हंगाम सुरू करणे अडचणीचे असल्याने केंद्र शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. तसे झाल्यास पुढील हंगामाचे नियोजन करणे सोयीचे होईल. - पी. जी. मेढे, साखरतज्ज्ञ, साखर उद्योग अभ्यासक