Join us

शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू होणार का? जिल्हा उपनिबंधक याबाबत काय म्हणाले? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 4:34 PM

अकोला जिल्ह्यात यावर्षी खरीप आणि रब्बी व उन्हाळी ज्वारीचा पेरा वाढला आहे.

अकोला जिल्ह्यात यावर्षी खरीप आणि रब्बी व उन्हाळी ज्वारीचा पेरा वाढला आहे. परंतु दर कमी असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादनही खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, असे झाल्यास शेतकऱ्यांना किमान आधारभूतप्रमाणे प्रतिक्विंटल १,३८० रुपये दर मिळणार आहेत. जिल्ह्यात गत खरीप हंगामात ४ हजार ९० हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली होती. रब्बी हंगामातही बऱ्यापैकी पेरणी झाली आहे. तसेच उन्हाळी हंगामात ३,९०० हेक्टरवर ज्वारीचा पेरा करण्यात आला आहे. परंतु ज्वारीला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

अकोला जिल्ह्यात ज्वारीचीच सर्वाधिक पेरणी केली जायची, परंतु पावसाचा परिणाम व वन्यप्राण्यांचा हैदोस यामुळे पेरणी घटली असली तरी ज्वारीला मिळणारे अल्पदर हाही त्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्वारीचे दर कमी असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पिकापासून पाठ फिरवली आहे. पंरतु गत खरीप हंगाम सोडला तर आता उन्हाळी ज्वारीची पेरणी वाढली असून, यावर्षी प्रथमच ही पेरणी जवळपास चार हजार हेक्टरपर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, आधारभूत दराने ज्वारी केंद्र सुरू करण्यात यावे, यासाठीचा प्रस्ताव जिल्हा सहकारी उपनिबंधकांनी तयार केला असून, या संदर्भात शासन व महाराष्ट्र राज्य पणन महासंघासोबत पत्रव्यवहार करण्यात येत आहे

उत्पादन एकरी १० क्विं.

ज्वारी पीक पहिले जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकापैकी एक पीक होते परंतु कालांतराने कमी झाले आता पुन्हा हळूहळू उन्हाळी ज्वारीचा पेरा वाढत आहे खरीप आणि उन्हाळी ज्वारीचे उत्पादन जवळपास एकरी १० क्विंटल असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी दिली. तर बाजारात सध्या ज्वारी लोकल ज्वारीला कमी दर असून, शुक्रवार, ३ मे रोजी प्रतिक्चिटल कमीत कमी दर हे १,७१० रुपये, जास्तीत जास्त २,८३० व सरासरी दर हे २,३०० रुपये आहेत.

शासकीय खरेदी केंद्राची प्रतीक्षा 

मागील वर्षीच्या हंगामात जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये १८ हजार ३७० क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली होती. यंदाच्या उन्हाळी हंगामात ३० एप्रिलपर्यंत २५ हजार १८५ क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आली आहे. आवक वाढली असली तरी बाजार समित्यांमधील लिलावात ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ८५० ते २ हजार ३७० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ज्वारीला मिळणारा हा दर शासनाने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात आधारभूत किंमत दराने ज्वारीची खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रे केव्हा सुरू होणार, याबाबत ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

मागील वर्षीच्या हंगामात जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये १८ हजार क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. यावर्षीच्या हंगामात आतापर्यंत २५ हजार क्विंटल ज्वारीची आवक झाली आहे. ज्वारीची आणखी आवक वाढणार असून, किमान आधार किंमत दरानुसार ज्वारीची खरेदी व्हावी, यासाठी जिल्ह्यात शासकीय ज्वारी खरेदी केंद्रे सुरू करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठविले आहे.

-डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

टॅग्स :ज्वारीबाजारशेतीशेती क्षेत्रअकोला