वाळलेल्या तेजापूर या गावरान लाल मिरचीला प्रति किलो केवळ १५० रुपयांचा दर बाजारात मिळत आहे. त्यामुळे यातून लागवड खर्चही निघत नसल्याने सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तर, दुसरीकडे बाहेर जिल्ह्यातून व्यापाऱ्यांनी खरेदी करून आणलेल्या रसगुल्ला मिरचीला ४५० रुपये दर बाजारात मिळत आहे. या दरातील तफावतीमुळे शेतकरी कंगाल, तर व्यापारी मालामाल होत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
वाळलेली मिरची खरेदी करून तिखट, मसाले तयार करण्याची लगबग सध्या ग्रामीण भागात जोरात सुरू आहे. त्यामुळे मिरची बाजारपेठ चांगलीच गजबजलेली दिसून येत आहे. बाजारात लाल मिरचीची सध्या मोठी आवक असून, मागणीच्या तुलनेत तिचे उत्पादन कमीच आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात ३५० रुपये किलोने मिळणारी मिरची आता ४५० रुपये किलो दराने विकत घ्यावी लागत आहे.
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, घरगुती मसाला तयार करण्याचा हाच हंगाम असतो. यंदा लाल मिरचीचा भाव वाढला असल्याने त्याचा ठसका ग्राहकांना बसत आहे. भाव वाढल्याने तिखट, गरम मसाल्याचे प्रमाण कमी केले जात आहे. शेतकऱ्यांच्या वाळलेल्या तेजापूर गावरान लाल मिरचीला प्रति किलो १५० रुपये, तर व्यापाऱ्यांजवळ असलेल्या रसगुल्ला मिरचीला ४५० रुपये, तर चपाटा जातीच्या मिरचीला ३५० रुपये प्रति किलो दर मिळत असल्याचे चित्र लिहाखेडी परिसरात बघायला मिळत आहे.
या दरातील तफावतीमुळे शेतकरी कंगाल, तर व्यापारी मालामाल होत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. लिहाखेडी परिसरात मोठया प्रमाणात शेतकऱ्यांनी तेजापूर गावरान मिरची आणि चपाटा सिमला मिरचीची लागवड केलेली आहे. सिमला मिरचीला प्रति किलो ३५० रुपये हा दर मिळत आहे. परंतु, गावरान तेजापूर मिस्चीला केवळ १५० रुपयांचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय गुंटूर मिरचीला १०० रुपयांचा दर मिळत आहे. मागणी वाढली, तरीही हवी तितकी मिरची बाजारात उपलब्ध नसल्याने मसाल्याच्या एकूण दराला महागाईची झळ बसत आहे.
यंदा सुक्या लाल मिरचीच्या दरामध्ये प्रतिकिलो वीस रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मसाल्याचेही भावही वाढलेले आहेत. गरम मसाल्याचे दरही वाढले असून, जिरे चांगलेच भाव खात आहेत. प्रत्येक वर्षी गरम मसाल्याच्या किमतीमध्ये वाढ होत आहे.- दीपक कळाने, व्यापारी
नंदुरबारच्या प्रसिद्ध मिरची मार्केटमध्ये लाल मिरचीने सर्वाधिक भावाचा रेकॉर्ड तोडला
लिहाखेडी परिसरात काही ठिकाणी मिरची पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा मिरचीचे उत्पादन कमी झाले. परिणामी व्यापारी तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातून मिरचीची आयात करीत आहेत. परंतु, इतर मिरचीपेक्षा गावरान तेजापूर मिरचीला प्रति किलो १५० रुपये हा दर मिळत असल्याचे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. - कृष्णा साखळे, मिरची उत्पादक शेतकरी