Join us

सोयाबीनचा भाव पुन्हा २०० रुपयांनी घसरला, सध्या क्विंटलमागे काय मिळतोय भाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 11:00 AM

नवे सोयाबीन येऊन सुमारे दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी सोयाबीनला ५ हजारांवर भाव मिळत नसल्याचे चित्र

दोन दिवसांपूर्वी पाच हजाराच्या पुढे असलेला सोयाबीनचा भाव पुन्हा घसरला आहे. तर दुसरीकडे बाजार समितीमध्ये सध्या शेतमालाची आवकही कमी झाल्याचे दिसत आहे. बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २ डिसेंबर रोजी सर्व शेतमालाची एकूण ११० क्विंटल आवक झाली. गुरुवारी सोयाबीनला ४,९८० ते ५,१०० पर्यंत भाव मिळाला. शनिवारी सोयाबीनची केवळ ३४ क्विंटल आवक झाली. तर भाव किमान ४,७५० ते ४,८५० रुपये मिळाला. सरासरी भाव ४,८३४ रुपये दर्जानुसार मिळाला.

बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक ३३.५० किलो झाली. किमान भाव ३,००० ते कमाल भाव ५,६७० रुपये मिळाला. सरासरी ४,०९३ रुपये भाव राहिले. गव्हाची २७ क्विंटल आवक झाली. भाव २,०११ ते ३,१९९ रुपये मिळाला. सरासरी भाव २,६७० राहिला. हरभरा, उडीद चार क्विंटल, तूर दोन क्विंटल, बाजरी साडेतीन क्विंटल तर मका दोन क्विंटल अशी अत्यल्प आवक झाली. हरभऱ्याला ४९,०७१, उडदाला ८,८५०, बाजरीला २,८५० तर मक्याला १,९०० रुपये सरासरी भाव मिळाला.

हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात सोयाबीनचे गत आठवड्यात दोनशे रुपयांनी वधारलेले भाव पुन्हा घसरले आहेत. त्यामुळे सरासरी दोन हजार क्विंटलची आवक शनिवारी १ हजार ६०० क्विंटलवर आली होती, तर सरासरी सरासरी ४ हजार ८२५ रुपये भाव मिळाला. भावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे.

यंदा उत्पादन घटल्यामुळे सोयाबीनला किमान सहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु नवे सोयाबीन येऊन सुमारे दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी सोयाबीनला ५ हजारांवर भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. हिंगोलीच्या मोंढ्यात गत आठवड्यात ५ हजार २०० रुपयांपर्यंत भाव गेले होते. परंतु दोनच दिवसांत पुन्हा वाढलेले भाव घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. त्यामुळे दोन हजार क्विंटलवर गेलेली आवक दीड हजार क्विंटलवर आली आहे. शनिवारी मोंढ्यात १ हजार ६०० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. ४ हजार ६५० ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. तर सरासरी ४ हजार ८२५ रुपये भाव राहिला. भावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांची निराशा होऊ लागली असून, भाववाढीची अपेक्षा आहे.

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड