हिंगोलीबाजार समितीच्या मार्केट यार्डात ऑगस्टमध्ये १७ हजार ३०० वर पोहोचलेली हळद ११ सप्टेंबर रोजी १२ हजार ५०० रुपयांनी विक्री झाली. क्विंटलमागे जवळपास चार हजारांनी दर घसरल्याने भाववाढीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांची निराशा झाली आहे; परंतु गणेशोत्सवानंतर भाव वधारतील आणि ऑगस्टमध्ये मिळालेल्या दरापेक्षाही जास्त दराने हळद विक्री होईल, अशी शक्यता आहे. येथील संत नामदेव हळद मार्केट यार्डात यंदा मराठवाड्यासह विदर्भातून हळदीची आवक झाली. जूनमध्ये ७ ते ८ हजारांदरम्यान हळदीला दर मिळाला. तर १५ जुलैनंतर मात्र भावात वाढ झाली.
३१ जुलै रोजी येथील मार्केट यार्डात १२ हजार ५५० ते १५ हजारांदरम्यान भाव मिळाला होता. त्यानंतरही जवळपास वीस दिवस हळदीचे दर वधारत राहिले. ४ ऑगस्ट रोजी हळदीला १४ हजार ते १७ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. यादरम्यान ज्या शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत हळद विक्रीविना ठेवली होती, त्यांनी विक्री केली. तर आणखी भाव वाढतील या आशेवर व्यापाऱ्यांनीही चढ्या दराने हळद खरेदी केली. ११ सप्टेंबर रोजी किमान ११ हजार ते कमाल १२ हजार ५५५ रुपये हळदीला दर मिळाला. तर सरासरी ११ हजार ७७७ रुपये भाव राहिला. दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.