Join us

हळदीचा भाव पाचशेने घसरला; उत्पादकांची धाकधूक वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 9:31 AM

आवक मंदावण्याची शक्यता

हिंगोली येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात सरासरी १६ हजारांवर गेलेला हळदीचा भाव पाचशे रुपयांनी घसरला. मागील चार त्यात वाढ झाली नसून, गतवर्षीप्रमाणे भावात घसरण होते की काय? अशी भीती निर्माण झाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान, सोमवारी हळदीची बीट असून, या दिवशी भाव वधारावेत, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

यंदा एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हळदीला सरासरी १६ हजार रुपयांवर भाव मिळाला. तर काही शेतकऱ्यांची निवडक हळद १८ हजार रूपये क्विंटलप्रमाणे विक्री झाली. समाधानकारक भाव मिळत असल्याने मार्केट यार्डातहिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यासह विदर्भातील यवतमाळ, वाशिम, रिसोड, वर्धा भागातील शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणली.

त्यामुळे मार्केट यार्डात विक्रमी आवक होत आहे. हळदीच्या वाहनांची एक ते दीड कि.मी.पर्यंत रांग लागल्याने शेतकऱ्यांवर तीन ते चार दिवसांपर्यंत मुक्काम ठोकण्याची वेळ येत आहे.

३ मे रोजी झालेल्या बीटात हळदीला १५ ते १७ हजार १०० रुपयांदरम्यान भाव मिळाला. हा भाव समाधानकारक असल्यामुळे हळदीची आवक वाढली होती. परंतु, ६ मे रोजी मात्र भावात जवळपास क्विंटलमागे पाचशे रुपयांची घसरण झाली. या दिवशी हळदीला १४ हजार ३०० ते १६ हजार ६०० रुपयांदरम्यान भाव मिळाला.

भाव घसरल्यामुळे ११ मे रोजी हळदीची आवक घटली. या दिवशी १ हजार ८९५ क्विंटल हळद विक्रीसाठी आली. तर १४ हजार ५०० ते १६ हजार ६५० रुपयांदरम्यान भाव मिळाला. चार दिवसांत पाचशे रुपयांची घसरण झाल्याने ज्या शेतकऱ्यांनी हळद विक्री केली नाही, त्यांची धाकधूक वाढली आहे.

गतवर्षी हळदीला सरासरी १६ हजारांपर्यंत भाव मिळाला. परंतु, मे, जूनमध्ये भावात घसरण झाली होती. घसरलेले भाव नंतर वधारले नसल्याने शेतकऱ्यांना कमी भावात हळद विक्री करण्याची वेळ आली होती. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शेतकरी आत्ताच हळद विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत.

परंतु, आता विक्री केली तरी गत आठवड्याच्या तुलनेत पाचशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाववाढीची प्रतीक्षा केली जात आहे.

भुईमुगाचे उत्पादन घटले

जिल्ह्यात यंदा भुईमुगाचे उत्पादन घटले. त्यामुळे या पिकाला बाजारात सरासरी ७ हजार रुपयांचा भाव मिळणे अपेक्षित होते. मात्र, सध्या हिंगोलीच्या मोंड्यात सरासरी केवळ ५ हजार ८२७ रुपये भाव मिळत आहे. घटलेल्या उत्पादनाच्या तुलनेत भाव कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्यात मोंड्यात ५०० ते ६०० क्विंटल भुईमूग शेंग विक्रीसाठी येत आहे. ५ हजार ५०० ते ६ हजार १०० रुपये भाव मिळत आहे.

सोयाबीनचा भाव वाढता वाढेना...

यंदा सोयाबीन दरवाढीची कोंडी कायम असल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. पावसाचा लहरीपणा, येलोमोॉकच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन निम्याखाली आले होते. अशा परिस्थितीत सोयाबीनला किमान ६ हजार रुपयांचा भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पाच हजारांच्या वर भाव गेला नाही. परिणामी, शेतकऱ्यांना फटका बसला, जवळपास पाच महिने भाववाढीची प्रतीक्षा करूनही दरकोंडी कायम आहे.

हेही वाचा - स्पर्धा परीक्षा सोडून माळरानात फुलविली फळबाग; मराठवाड्यात परदेशी फळांचा थाट

टॅग्स :बाजारहिंगोलीपीकशेतकरीशेतीसोयाबीनमार्केट यार्ड