होळीच्या पार्श्वभूमीवर बेदाणा दरात असणारी तेजी यंदा मंदावली आहे. जानेवारी ते एप्रिल असा चार महिने चालणारा हंगाम यंदा तीनच महिनेच चालेल असे उत्पादक सांगत असून मागील चार दिवसांपासून बेदाण्यांची आवकही मंदावली आहे.
राज्यात बेदाणा उत्पादनात मागील काही दिवसांपासून घट दिसून येत असून सांगलीचे बेदाणा मार्केट थंडावले आहे. तासगावात मागील दोन दिवसांपासून बेदाण्याची आवक घटली असून यंदा दर्जेदार द्राक्षांअभावी बेदाणा उत्पादन घटले आहे.
महाराष्ट्रात द्राक्ष उत्पादनापासून वाईन आणि बेदाणा असे दोन पदार्थ महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तयार होतात. बेदाणा निर्मितीतील महाराष्ट्राचा वाटा देशात सर्वात अधिक असून सांगली, सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वात अधिक बेदाणा निर्मिती होते.दरवर्षी एप्रिलच्या अखेरीस होणारे बेदाणा उत्पादन यंदा मार्चअखेरपर्यंत सुरु राहून नंतर त्यात घट होण्याचा अंदाज आहे.
बदलते हवामान, अवकाळी पावसाने यंदा द्राक्ष उत्पादनावर मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्षावर रोगांचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे द्राक्ष उत्पादन घटले आहे. परिणामी बेदाण्यांसाठी दर्जेदार द्राक्षांची कमतरता भासत आहे.राज्यात सोमवारी हिरवा, काळा आणि पिवळ्या बेदाण्याची आवक झाली असून सांगलीत आज ११ हजार ९७१ क्विंटल बेदाणे विक्रीसाठी आले होते. क्विंटलमागे साधारण १३ हजार ८०० रुपये भाव मिळत आहे.