वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांत मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर आहेत. तथापि, आता खरीप हंगामाची तयारी शेतकरी करीत आहेत. यासाठी पैसा हाती असणे आवश्यक असल्याने शेतकरी दरवाढीच्या अपेक्षेने साठवलेले सोयाबीन विकू लागले आहेत. त्यामुळे बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढत असल्याचे दिसत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी सोयाबीनच्या दरात किंचित तेजी आली होती. नाफेडने हमीभाव खरेदीला मुदतवाढ दिल्यानंतर सोयाबीनचे दर पावणे सहा हजारांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे सोयाबीनचे दर पाच हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता वाटू लागली होती. तथापि, नाफेडच्या खरेदीची मुदत संपत आली असतानाच बाजार समित्यांत पुन्हा सोयाबीनच्या दरात घसरण सुरू झाली.
सद्यःस्थितीत जिल्ह्यातील बाजार समित्यात सोयाबीनला कमाल सरासरी ४ हजार ५०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे दर मिळत आहेत. पुढे सोयाबीनच्या दरात वाढ होईल की नाही, याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही. खरिपाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना पैसा हवा आहे. त्यामुळे ते सोयाबीन विकत आहेत.
कोठे किती क्विंटल आवक?
६५०० - वाशिम
४५०० - कारंजा
१४०० - मं.पीर
५०० - मानोरा
कोठे किती कमाल दर?
४५८० - कारंजा
४५७५ - मं.पीर
४५६० - मानोरा
४५२१ - वाशिम
सोयाबीनचे दर वाढणार का?
सोयाबीनच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. सद्य:स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी आणि खाद्यतेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर निर्यातीच्या संधीही वाढतील. त्यामुळे आगामी काळात सोयाबीनचे दर चांगले राहणार आहेत, याचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांनी वर्तविली आहे.
अद्यापही अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक
यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. तर सोयाबीनचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी मात्र काही शेतकरी गरजेनुसार सोयाबीन विकू लागले आहेत. त्यामुळेच बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढू लागली आहे.
आवक आणखी वाढणार
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला वेग दिला आहे. त्यामुळे ते साठवलेला शेतमाल विकत आहेत. बाजार समित्यांत सोयाबीनच नव्हे, तर शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या इतरही मालाची चांगली आवक होत आहे. आगामी दोन आठवडे बाजार समित्यांत सोयाबीनसह इतरही शेतमालाची आवक वाढतीच राहणार आहे.
हेही वाचा - स्पर्धा परीक्षा सोडून माळरानात फुलविली फळबाग; मराठवाड्यात परदेशी फळांचा थाट