जागतिक बाजारपेठेत मंदी असल्याने कापसाला फटका बसला आहे. येत्या मार्च महिन्यापर्यंत हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. कापसाला उठाव नसल्याने सरकीचे दर कोसळले आहेत. यामुळे शेतकऱ्यांसह जिनिंग उद्योजकही हवालदिल झाले आहेत. त्यामुळे जिनींग उद्योगही कुठे बंद तर कुठे चालू अवस्थेत पाहायला मिळत आहेत.
शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. यंदा मात्र कापसाने शेतकरी वर्गासह जिनिग उद्योजकांनाही रडकुंडीला आणले आहे. गतवर्षी कापसाला नऊ हजाराचा भाव मिळाला होता. आज कापसाला सहा हजार सातरी ते आठशे रुपयाचा दर आहे. तर नवीन फरदडच्या कापसाला केवळ पाच हजाराचा भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा कापूस उत्पादनाचा खर्चही निघणार नाही, कापसाला भाव नसल्याने माल घरात पडून आहे. जिनिंगमध्ये ठणठणाट आहे.
यंदा जानेवारी महिना अर्धा संपला तरी जिनिगची चाके कापसाअभावी आठवड्यात फक्त चार दिवस चालत आहेत. त्यामुळे शेतकरी तसेच जिनिग उद्योजकही अडचणीत आले आहेत. कापसाचे दर घसरत असल्याने सरकीचे दरही पडत आहेत, तर कापसाच्या गाठींनाही सतत भाव घसरणीचा फटका सोसावा लागत आहे. आज सरकी दोन हजार सातसे पन्नास ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलने घेतली जात आहे. कापूस गठाणीचे प्रति खंडी 54 हजार 500 रुपये असे दर आहे. गतवर्षी हीच खंडी 60 हजारापर्यंत पोहचली होती.
जागतिक मंदीचे सावट
जिनिग उद्योजक शिरीष जैन म्हणाले की, जागतिक बाजारपेठेत मंदीचे सावट असल्याने कापसाला उठाव नाही. वामुळे दरवाढ होत नाही. मार्च महिन्याच्या सुरुवातीला काहीशी दरवाढ होण्याची शक्यता आहे. तर कालचा कापूस दर पाहिला असता सर्वांत जास्त सरासरी दर हा 7 हजार 30 रूपये परभणी बाजार समितीमध्ये मिळाला असून नेर परसोपंत बाजार समितीमध्ये 5 हजार 900 रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. नेर परसोपंत बाजार समितीमध्ये मिळालेला दर हा आजच्या दिवसातील निच्चांकी सरासरी दर होता. या दराचा विचार केला तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा 1 हजार 120 रूपये प्रतिक्विंटल कमी मिळताना दिसत आहेत.