यंदा दिवाळीचा मुहूर्त पाहून अनेक शेतकऱ्यांनी आपला माल बाजारात आणला आहे. खरिपातील सोयाबीन, कांदा कापसाचे उत्पादन घटले असले तरी दर साधारणच आहेत पण तरीही शेतकऱ्यांना माल विकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. दिवाळीमध्ये दोन दिवस बाजार समित्यांना सुट्टी असते. पण अनेक बाजार समित्यांमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर मालाची खरेदी केली जाते. शेतकरीही पाडव्याच्या किंवा लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शेतमाल विक्री करून लक्ष्मी घरात नेत असतात.
दरम्यान, सलग तीन दिवस कोणतीच बाजार समिती बंद ठेवण्यास परवानगी दिली जात नाही. नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्या येणाऱ्या जवळपास १० दिवसांसाठी बंद असणार आहेत. व्यापाऱ्यांनी अर्ज देऊन बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील काही बाजार समित्यांना दिवाळीच्या दरम्यान दोन दिवसांची सुट्टी असते. त्यामुळे आपला माल बाजारात आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बाजार समित्यांना सुट्टी आहे की नाही यासंदर्भात माहिती घेणे आवश्यक आहे.
दिवाळीतील लक्ष्मीपूजन आणि दिपावली पाडवा हे दोन दिवस धान्य आणि भुसार मालाच्या व्यवहाराला सुट्टी असली तरी भाजीपाल्याचे बाजार सुरूच असणार आहेत. बाजार समिती बंद ठेवायची असेल तर स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जातो. पण तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस बाजार समिती बंद ठेवता येत नाही.
पणन मंडळांनी आदेश देऊनही नाशिकमधील व्यापाऱ्यांनी बाजार समितीतील कांदा लिलाव बंद ठेवले आहेत. काही बाजार समित्यांनी १०, काहींनी ११ तर काही बाजार समित्यांनी थेट १३ दिवसांसाठी कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीत फटका बसणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील या बाजार समित्यात कांदा लिलाव असणार बंद
(बाजार समित्या - किती दिवस राहणार बंद) (आजपासून - ९ नोव्हेंबरपासून)
- मनमाड - आजपासून १० दिवस
- चांदवड - आजपासून १३ दिवस
- येवला- कालपासून ११ दिवस
- लासलगाव - ७ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर
- सिन्नर - कालपासून १२ दिवस
- सटाणा - आजपासून १० दिवस
- नांदगाव - आजपासून ११ दिवस
- देवळा - कालपासून १३ दिवस
- कळवण - आजपासून १० दिवस
- उमराणे - कालपासून १२ दिवस
- नामपूर - ७ नोव्हेंबरपासून १४ दिवस म्हणजे २० नोव्हेंबर