धर्मराज दळवेजेऊर : करमाळा तालुक्यातील उमरड येथील केळीला प्रतिकिलो ३२ रुपये दर मिळाल्याने केळी उत्पादक शेतकरी अनिल व सुनील वलटे यांनी फटाके फोडले अन् केळीच्या गाडीचे पूजन केले.
त्यानंतर २० टन माल परदेशात म्हणजे इराक, इराणला पाठविले. केळी खरेदी व्यापाऱ्याला फेटा बांधून सन्मान करत आनंद व्यक्त केला आहे. सध्या बाजारात केळीला मोठी मागणी आहे.
केळीची उपलब्धता कमी असल्याने काढणीस आलेल्या केळीला चांगला दर मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनिल वलटे व सुनील वलटे या बंधूंनी केडगाव (ता. करमाळा) हद्दीत साडेतीन एकर क्षेत्रावर केळी रोपांची लागवड केली होती.
याअगोदर कांद्याचे पीक घेतल्याने जमिनीचा पोत चांगला होता. शेणखताचा वापर करून मशागत केली होती. नंतर ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर करून केळीचे जोमदार पीक उभे केले.
वेळोवेळी फ्रूटकेअर करून योग्य पाणी व खत व्यवस्थापन केल्याने अकरा महिन्यांत केळी हार्वेस्टिंगला आली. सध्या निर्यातक्षम केळीला आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने व शेतकऱ्यांकडे अपेक्षित उपलब्धता नसल्याने चांगला दर मिळत आहे.
५० टन उत्पादन अपेक्षितकंदर येथील व्यापारी बालाजी पाटील यांनी केळी शेतामध्ये प्रतिकिलो ३२ रुपयाचा दर ठरवून एकाच दिवशी २० टन केळी काढून परदेशात निर्यातीसाठी पाठवली आहे. ५० टन उत्पादन अपेक्षित असून असाच दर राहिला तर २५ ते ३० लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
आजपर्यंत ऊस, कांदा, गहू, मका यासारखी पिके घेतली आहेत. पाच वर्षांपूर्वी केळीचे पीक घेतले होते. परंतु पाच ते सहा रूपये दर मिळाला होता. उत्पादन खर्च निघू शकला नव्हता. गेल्या दोन वर्षांपासून केळीला चांगला दर मिळत असल्याने पुन्हा केळी लागवड वाढवली. सध्या बत्तीस रुपये दर मिळाल्याचा आनंद आहे. - अनिल वलटे केळी उत्पादक शेतकरी