शीतल सदाशिव मोरे
आजरा : आजऱ्याच्या आठवडी बाजारात काजू बियांची आवक वाढली आहे. शुक्रवारी काजू बियांचा दर १०० ते १०५ रुपये दरम्यान होता. तालुक्यात प्रतिवर्षी काजू बियांच्या विक्रीतून ४० ते ५० कोटींची उलाढाल होते.
दर वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी बिया बाजारात विक्रीसाठी आणलेल्या नाहीत. परदेशातील काजू बियांची आवक थांबल्याने काजू प्रक्रिया उद्योजकांकडून स्थानिक काजू बियांची मागणी वाढली आहे.
आजच्या आठवडी बाजारात काजू बिया खरेदीसाठी चौकाचौकात २० ते २५ वजन काटे लागले होते. अनेक शेतकऱ्यांनी गरज म्हणून काजू बिया विक्रीकरिता आणल्या होत्या.
अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर काहींनी आकाजू बिया विकून सोने खरेदी केले. आजच्या बाजारदिवशी काटेधारकांकडून जवळपास ८ ते ९ क्विंटल काजू गोळा केला आहे.
परदेशातील बियांची आवक थांबली
तालुक्यात जवळपास २५० ते ३०० प्रक्रिया उद्योग आहेत. तालुक्यात उत्पादित होणाऱ्या काजू बिया अपुऱ्या पडत असल्याने परदेशातून काजू बिया आणल्या जातात. मात्र, चालू वर्षी अद्यापही परदेशातून काजू बियांची आवक झालेली नाही.
उदरनिर्वाह काजूच्या उत्पादनावर
• तालुक्यातील २५ ते ३० टक्के शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह काजूच्या उत्पादनावर अवलंबून आहे.
• प्रत्येक वर्षी झाडांना खते, औषध फवारणीचे काम वर्षभर शेतकरी करीत असतो.
• सध्या काजूची रखवाली व काजू गोळा करण्यात शेतकरी मग्न आहे.