रंग हिरवा, आकाराने आवळ्यापेक्षा लहान अशा चेकनट या बोरांची मार्केट यार्डात आवक आणि मागणीही वाढली आहे. चण्यामण्या, उमराण, चमेली, चेकनट या बोरांना अधिक पसंती मिळत आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात गेल्या आठवड्यापासून आवक सुरू असून मागणीही वाढू लागली आहे.
सोलापूर, बारामती, इंदापूर या भागातून चमेली आणि उमराण, चेकनट बोरांची सुमारे १० ते १२ टन आवक झाली. सध्या थंडीत चण्यामण्या आणि चेकनट या बोरांना मागणी वाढली असून, भावात तेजी आहे. चमेली बोराला प्रति किलोला ३० ते ४० रुपये भाव मिळत आहे. तर उमराण १८ ते २२ रुपये आणि चण्यामण्याला ४० ते ५५ रुपये भाव मिळत आहे. या बोरांचा हंगाम नोव्हेंबर ते फेब्रुवारी असतो. मुलांसह पालकही बोर आनंदाने खात आहे.
चेकनटला मागणी का?
हि बोरे चवीला आंबट, गोड गावठी बोरासारखी लागतात. आता गावठी बोर जास्त दिसत नाहीत. त्याला चांगला पर्याय म्हणून हे बोर उत्तम आहे आणि उत्पादन हि चांगले आहे. सद्या संक्रांतीच्या सणासाठी याला खूप मागणी दिसत आहे.
पुणे मार्केट यार्ड बाजारात रविवारी चमेली आणि उमराण, चेकनट बोरांची आवक वाढली. सध्या भाव तेजीत आहेत. लहान आकार आणि रंगामुळे चेकनट बोर ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. शहरातील स्थानिक ग्राहकांचा कल या बोरांकडे वाढला आहे. त्यामुळे बाजारात या बोरांना ७० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. १० ते १२ टन रविवारी आवक झाली आहे. - संभाजी इंगुळकर, व्यापारी मार्केट यार्ड