नवी मुंबई : डाळींचे देशांतर्गत उत्पादन कमी झाल्यामुळे व अपेक्षित आयात होत नसल्यामुळे गतवर्षभरामध्ये डाळींचे भाव तेजीत आहेत. एप्रिलमध्ये नवीन डाळी व कडधान्ये विक्रीसाठी येणार असली, तरी यावर्षीही तुटवडा असल्यामुळे दर कमी होण्याची शक्यता नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले असून संपूर्ण वर्षभर डाळींची तेजी कायम राहणार आहे.
गहू, तांदळाप्रमाणे डाळी व कडधान्यांच्या बाबतीमध्ये देश अद्याप स्वयंपूर्ण झालेला नाही. देशवासीयांना पुरेल एवढ्या कडधान्याचे उत्पादन होत नसल्यामुळे प्रत्येक वर्षी कडधान्य मोठ्या प्रमाणात आयात करावे लागते.
गतवर्षी देशांतर्गत पीक पुरेसे झाले नव्हते व आयातही योग्य प्रमाणात झाली नाही. यामुळे संपूर्ण वर्षभर डाळींचे दर वाढले होते. यावर्षीही तीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
यावर्षी नवीन हंगाम एप्रिलमध्ये सुरू होईल. नवीन मालाची आवक सुरू झाली की, काही प्रमाणात दर कमी होतात; पण यावर्षीही उत्पादन पुरेसे झालेले नाही. यामुळे दर कमी होण्याची शक्यता नाही.
मसूरडाळीचा दिलासा
• गत वर्षभरामध्ये मूगडाळ, तूरडाळ, वाटाणा, हरभरा डाळीचे दर सातत्याने वाढत आहेत. संपूर्ण वर्षभरात फक्त मसूर व मसूरडाळीचे दर स्थिर राहिले आहेत.
• अख्खा मसूर गतवर्षी ६५ ते ७८ रुपये किलो व आता ६४ ते ७५ रुपये किलो दराने विकला जात आहे. मसूरडाळीचे दर वर्षभरापासून ७० ते ८० रुपये किलो आहेत.
कोणत्या डाळीचे काय भाव?
कडधान्य/डाळी | २०२३ | २०२४ |
चवळी | ६२ ते १०० | ९० ते १२५ |
हरभरा | ४६ ते ६३ | ५८ ते ८० |
हरभरा डाळ | ५६ ते ६७ | ६८ ते ८० |
मसूरडाळ | ७० ते ८० | ७० ते ८० |
उडीद | ७० ते १०५ | ९८ ते ११० |
उडीद डाळ | ८० ते १०५ | ११० ते १३५ |
मूग | ७८ ते ११० | ९५ ते १४० |
मूगडाळ | ८० ते ११० | १०५ ते १७५ |
तूरडाळ | ८० ते ११० | १०५ ते १७५ |
वाटाणा | ५४ ते ९० | ४८ ते १०० |
बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४५ टन हरभरा, ५० टन हरभरा डाळीची आवक झाली. १०९ टन मसूरडाळ, ५५ टन उडीदडाळ, ८९ टन मूगडाळ व १०० टन तूरडाळीची आवक झाली आहे. सर्वाधिक १८६ टन वाटाण्याची आवक झाली आहे. - नीलेश वीरा, संचालक, धान्य मार्केट